यूएलसी घोटाळ्यातील फरार आरोपी घेवारे याला सुरतमधून अटक   

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2021 08:54 PM2021-06-25T20:54:45+5:302021-06-25T21:07:22+5:30

ULC scam : घेवारे याला ठाणे न्यायालयात हजर केले असता २८ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Gheware, a fugitive accused in the ULC scam, was arrested from Surat | यूएलसी घोटाळ्यातील फरार आरोपी घेवारे याला सुरतमधून अटक   

यूएलसी घोटाळ्यातील फरार आरोपी घेवारे याला सुरतमधून अटक   

googlenewsNext

मीरा रोड - मीरा भाईंदरमधील १०२ कोटी रुपयांच्या यूएलसी घोटाळ्यातील मुख्य फरार आरोपी मीरा भाईंदर महानगरपालिकेचा नगररचनाकार दिलीप घेवारे याला ठाण्याच्या सीआययु व गुन्हे शाखेच्या पथकाने गुजरातच्या सुरत मधून शुक्रवारी सकाळी अटक केली आहे.  घेवारे याला ठाणे न्यायालयात हजर केले असता २८ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

रहिवास झोन असताना ग्रीन झोन दाखवून पाच भुखंड प्रकरणात बनावट व खोट्या यूएलसी प्रमाणपत्राच्या आधारे शासनाला १०२ कोटी रुपयांचा चुना लावण्यात आल्याचे प्रकरण २०१६ साली उघडकीस आले होते. त्यावेळी ठाणे नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येऊन चार विकासका सह एका त्रयस्थ आरोपीस पोलिसांनीअटक करून चार्जशीट दाखल केली होती.  त्यावेळी परमबिर सिंह हे ठाण्याचे पोलीस आयुक्त होते.

 सदर प्रकरणी भाईंदरमधील विकासक राजू शाह यांनी पोलीस महासंचालक व शासनाकडे नुकतीच तक्रार केली होती. परमबिर सिंह यांनी मोठी रक्कम घेऊन अन्य आरोपींना संरक्षण दिले व सखोल तपास न करता प्रकरण बंद केल्याचा आरोप शहा यांनी केला होता.

 त्यानंतर ठाणे शहर पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सरदार पाटील यांनी तपासाला पुन्हा सुरुवात केली होती. तपासामध्ये पोलिसांनी १० जून रोजी मीरा भाईंदर महापालिकेचे निवृत्त सहाय्यक नगररचनाकार सत्यवान धनेगावे, वास्तुविशारद चंद्रशेखर लिमये व सध्या पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत आरेखक भरत कांबळे याना अटक केली. परंतु दिलीप घेवारे मात्र पसार झाला. दरम्यान घेवारे याने ठाणे न्यायालयातून अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून प्रयत्न चालवले होते. आज शुक्रवारी त्याच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी सुद्धा होणार होती.

त्यामुळे घेवारे याला अटक करण्यासाठी पोलिसांनी जोरदार हालचाली सुरू केल्या होत्या.  ठाण्याच्या गुन्हे मध्यवर्ती शाखेचे (सीआययु) पोलीस निरीक्षक अनिल होनराव, गुन्हे शाखा भिवंडी युनिट २ चे पोलीस निरीक्षक अशोक होनमाने आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र जाधव यांच्या पथकाने आज शुक्रवारी सकाळी साडे नऊच्या दरम्यान गुजरातच्या सुरत भागातून घेवारेला शिताफीने अटक केली.  घेवारे हा सुरत भागात लपलेला असल्याचे तसेच सकाळी तो एका मंदिरात दर्शनासाठी येणार असल्याची माहिती पोलीस पथकास मिळाली होती. त्या अनुषंगाने पोलिसांनी सापळा रचला होता. घेवारे याला दर्शन करू दिल्यानंतर पोलिसांनी ताब्यात घेतले. 

त्याला ठाणे येथे आणल्यानंतर पोलिसांनी ठाणे न्यायालयात हजर केले. न्यायालयाने घेवारेला २८ जून पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. घेवारे हा यूएलसी घोटाळ्यातील मुख्य आरोपी आहे. २००३ - २००४ दरम्यान ठाणे यूएलसी विभागात असताना विकासकां कडून सुमारे ७० लाख रुपये घेऊन बनावट यूएलसी प्रमाणपत्रे दिली होती. तर यूएलसी घोटाळ्याची आणखी प्रकरणे चौकशीत समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

घेवारे याला अटक करताच गुन्हे शाखेच्या पथकाने महापालिका आयुक्तांना त्याला अटक केल्याची माहिती पत्रा द्वारे दिली. तर एका पथकाने नगररचना विभागातून काही फाईली ताब्यात घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. 

Web Title: Gheware, a fugitive accused in the ULC scam, was arrested from Surat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.