आधी पत्नीला संपवलं, नंतर पतीने स्वतःही घेतला जगाचा निरोप; मरणापूर्वी भिंतीवर लिपस्टिकने लिहिली संपूर्ण कहाणी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 16:28 IST2025-11-25T16:28:11+5:302025-11-25T16:28:44+5:30
खोलीच्या भिंतीवर लिपस्टिकने अनेक गोष्टी लिहिलेल्या होत्या. त्यातला मुख्य संदेश असा होता की, "राजेश विश्वासच्या कारणामुळे आम्ही मरत आहोत."

आधी पत्नीला संपवलं, नंतर पतीने स्वतःही घेतला जगाचा निरोप; मरणापूर्वी भिंतीवर लिपस्टिकने लिहिली संपूर्ण कहाणी!
बिलासपूरमध्ये पती-पत्नीच्या संशयास्पद मृत्यूमुळे मोठी खळबळ उडाली आहे. सरकंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अटल आवासमध्ये राहणाऱ्या राज तांबे आणि नेहा उर्फ शिवानी तांबे हे दाम्पत्य २४ नोव्हेंबर रोजी एकाच खोलीत मृतावस्थेत आढळले. पत्नीचा मृतदेह पलंगावर होता, तर पती गळफास घेतलेल्या अवस्थेत पंख्याला लटकलेला होता. चरित्र संशयातून पतीने आधी पत्नीची हत्या केली आणि नंतर स्वतः आत्महत्या केली असा प्राथमिक संशय असून, मृत्यूपूर्वी पतीने भिंतीवर लिपस्टिकने लिहिलेला संदेश या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा पुरावा ठरला आहे.
भिंतीवर राजेश विश्वासचे नाव; प्रेमकथेचा दुर्दैवी अंत
पोलिसांना घटनास्थळी जी परिस्थिती दिसली, त्यावरून पतीने पत्नीचा जीव घेतल्याचे स्पष्ट होत आहे. खोलीच्या भिंतीवर लिपस्टिकने अनेक गोष्टी लिहिलेल्या होत्या. त्यातला मुख्य संदेश असा होता की, "राजेश विश्वासच्या कारणामुळे आम्ही मरत आहोत."
यासोबतच, पत्नी नेहा आपल्या आईच्या मोबाईलवरून राजेश विश्वासशी बोलत असे आणि ऊर्जा पार्कमध्ये त्याला भेटताना पकडली गेली होती, असेही भिंतीवर लिहिलेले होते. या संदेशामुळे या दुहेरी मृत्यूमागे 'राजेश विश्वास' नावाच्या व्यक्तीचा थेट संबंध असल्याचे स्पष्ट झाले आहे.
१० वर्षांपूर्वी केले होते प्रेमविवाह
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत नेहा उर्फ शिवानी आणि राज तांबे यांनी सुमारे दहा वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला होता. दोघेही लायन्स कंपनीत सफाई कामगार म्हणून काम करत होते आणि त्यांना तीन लहान मुले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून राज तांबे पत्नीच्या चारित्र्यावर अतिशय संशय घेत होता. या संशयामुळे दोघांमध्ये सातत्याने वाद होत होते.
आईने दरवाजा तोडला अन्..
घटनेच्या दिवशी सकाळीपासून घरातून कोणतीही हालचाल दिसली नाही. त्यामुळे जवळच राहणाऱ्या नेहाच्या आई रीना चिन्ना दुपारी तिला भेटायला गेल्या. आतून दरवाजा बंद होता. बराच वेळ हाका मारून प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. आतमध्ये पलंगावर निष्प्राण पडलेली मुलगी आणि पंख्याला लटकलेला जावई पाहून आईला मोठा धक्का बसला आणि त्या बेशुद्ध पडल्या. शेजाऱ्यांनी त्यांना सावरले आणि पोलिसांना घटनेची माहिती दिली.
गळा आवळून हत्या? फॉरेन्सिक टीमचा प्राथमिक अंदाज
पोलिसांनी फॉरेन्सिक टीमसोबत घटनास्थळाची तपासणी केली. भिंतीवरील संदेशाव्यतिरिक्त, एक सुसाईड नोट देखील पोलिसांना मिळाली आहे. या नोटमध्ये राजने पत्नीच्या वागणुकीमुळे आणि राजेश विश्वासमुळे आपण मानसिक तणावात होतो, त्यामुळे आत्महत्या करत असल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे. फॉरेन्सिक टीमच्या प्राथमिक तपासणीत नेहाच्या गळ्यावर ओरखडे आणि दाबल्याच्या खुणा आढळल्या आहेत. या खुणांवरून तिची हत्या गळा दाबून करण्यात आली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. पोलिसांनी पत्नीच्या खुनाचा आणि पतीच्या आत्महत्येचा गुन्हा दाखल केला असून, राजेश विश्वास या व्यक्तीबद्दल अधिक माहिती गोळा करण्याचे काम सुरू केले आहे.