नोटांचे बंडल, सोन्याचे दागिने...; बंगाल, झारखंडमध्ये कोळसा व्यापाऱ्यांच्या घरांवर ईडीचे छापे
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 11:20 IST2025-11-21T11:20:12+5:302025-11-21T11:20:54+5:30
पश्चिम बंगालपासून झारखंडपर्यंत कोळसा व्यापाऱ्यांवर ईडी छापे टाकत आहे.

फोटो - आजतक
पश्चिम बंगालपासूनझारखंडपर्यंत कोळसा व्यापाऱ्यांवर ईडी छापे टाकत आहे. बेकायदेशीर कोळसा खाणकाम, वाहतूक आणि साठवणुकीसंदर्भात बंगालमधील दुर्गापूर, पुरुलिया, हावडा आणि कोलकाता जिल्ह्यांमधील २४ ठिकाणी छापे टाकत आहे.
या छाप्यादरम्यान मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आणि सोनं जप्त करण्यात आलं आहे. झारखंडमधील १८ ठिकाणी छापे टाकण्यात येत आहेत. ईडीचे पथक रांची ते धनबनपर्यंत कोळसा माफियांच्या अड्ड्यांची झडती घेत आहेत. फोटोमध्ये ५०० रुपयांच्या नोटांच्या गठ्ठ्यांनी भरलेल्या ब्रीफकेस आणि बॅगा स्पष्टपणे दिसत आहेत. मोठ्या प्रमाणात सोन्याचे दागिने देखील जप्त करण्यात आले आहेत.
ज्या प्रमुख व्यक्तींच्या घरांवर छापे टाकले जात आहेत त्यात नरेंद्र खरका, युधिष्ठिर घोष, कृष्ण मुरारी कायल, चिन्मयी मंडल आणि राजकिशोर यादव यांचा समावेश आहे. सकाळी ६ वाजता सुरू झालेल्या या कारवाईत १०० हून अधिक ईडी अधिकारी सहभागी आहेत. या परिसरात निवासी मालमत्ता, कार्यालये, कोक प्लांट आणि बेकायदेशीर टोल संकलन बूथ/चेकपोस्ट यांचा समावेश आहे.
रांची प्रादेशिक कार्यालयातील ईडी पथक झारखंडमधील १८ ठिकाणी छापे टाकत आहे. ही कारवाई अनिल गोयल, संजय उद्योग, एल.बी. सिंह आणि अमर मंडल यांच्यासह अनेक मोठ्या कोळसा चोरी आणि तस्करीच्या प्रकरणांशी संबंधित आहे. ही कारवाई झारखंड आणि पश्चिम बंगालमधील कोळसा माफियांच्या विरोधात एक समन्वित आणि व्यापक मोहीम आहे.