मला शोधू नका! मी सोडून चाललोय; लॉकडाऊनला कंटाळून मुलाने सोडले घर
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2020 04:31 IST2020-06-30T04:31:39+5:302020-06-30T04:31:56+5:30
भायखळा परिसरात राहणाऱ्या त्याच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा मुलगा पदपथावर मोबाइल कव्हर विक्रीचा व्यवसाय करायचा.

मला शोधू नका! मी सोडून चाललोय; लॉकडाऊनला कंटाळून मुलाने सोडले घर
मुंबई: लॉकडाऊनमुळे कंटाळलेल्या १६ वर्षीय मुलाने ‘मला शोधू नका. मी तुमच्यासह या जगाला सोडून जात असल्याचे’ म्हणत घर सोडल्याची घटना भायखळ्यामध्ये घडली. याप्रकरणी भायखळा पोलीस अधिक तपास करत आहेत.
भायखळा परिसरात राहणाऱ्या त्याच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा मुलगा पदपथावर मोबाइल कव्हर विक्रीचा व्यवसाय करायचा. लॉकडाऊन घोषित झाल्यापासून तीन महिन्यांपासून तो घरीच होता. घरात बसून कंटाळलो असून कधीही घर सोडून जाईल, असे तो वेळोवेळी बोलत होता. त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. २७ तारखेला सकाळी साडेसहाच्या सुमारास तो घरात दिसून आला नाही. दरवाजाही उघडा होता. त्याचा शोध सुरू असताना, त्याने हिंदीमध्ये लिहिलेले पत्र बहिणीच्या हाती लागले. यात, ‘हम को खोजना मत... तुम को छोडकर जा रहा हूँ। और दुनिया को भी’ असे त्यात लिहिले होते. त्याचा मोबाइल फोनही घरातील टेबलवर ठेवलेला मिळून आला. रात्री उशिरापर्यंत त्याची वाट पाहूनही तो न परतल्याने कुटुंबीयांनी पोलिसात धाव घेत तक्रार दिली. याप्रकरणी पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंद करत अधिक तपास सुरू केला आहे.