झोपेतच दिले विषारी मर्क्युरीचे इंजेक्शन, ९ महिने तडफडल्यानंतर पत्नीचा मृत्यू; पती आणि सासऱ्याला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 17:34 IST2025-11-25T17:34:04+5:302025-11-25T17:34:27+5:30
बंगळुरुत पतीने पत्नीला विषारी इंजेक्शन देऊन तिची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे.

झोपेतच दिले विषारी मर्क्युरीचे इंजेक्शन, ९ महिने तडफडल्यानंतर पत्नीचा मृत्यू; पती आणि सासऱ्याला अटक
Bengaluru Crime: बंगळुरूमधून क्रूरतेची हद्द पार करणारी घटना समोर आली आहे. घरगुती छळातून एका पतीने आपल्या पत्नीच्या शरीरात थेट पारा या विषारी धातूचे इंजेक्शन दिल्याचे उघड झालं. या विषामुळे ती महिला तब्बल नऊ महिने मृत्यूशी झुंज देत होती आणि अखेरीस तिची प्राणज्योत मालवली. मृत्यूपूर्वी पीडित महिलेने पोलिसांना सविस्तर जबाब दिला असून, तिच्या निवेदनावरून आरोपी पतीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवरात्रीच्या दिवशी दिला पाऱ्याचे इंजेक्शन
विद्या (पीडित महिला) हिचे लग्न बसवराज याच्यासोबत झाले होते. त्यांच्या वैवाहिक जीवनात सुरुवातीपासूनच सतत छळ, अपमान होत होता. विद्याने पोलिसांना दिलेल्या सविस्तर जबाबात म्हटले आहे की, तिचा पती बसवराज तिला वारंवार वेडी म्हणायचा आणि तिला घरात कोंडून ठेवायचा. तो दररोज तिचा मानसिक छळ करायचा. या दोघांना चार वर्षांचा एक मुलगाही आहे.
पीडितेने दिलेल्या माहितीनुसार, २६ फेब्रुवारी २०२५ च्या रात्री ती गाढ झोपेत असताना तिच्या पतीने तिच्या उजव्या मांडीत गुपचूप पाऱ्याचे इंजेक्शन दिले. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी जेव्हा ती शुद्धीवर आली, तेव्हा तिच्या मांडीत तीव्र वेदना होत होत्या.
नऊ महिने मृत्यूशी संघर्ष
७ मार्च रोजी विद्या अट्टीबेले येथील सरकारी रुग्णालयात तपासणीसाठी गेली, जिथून तिला ऑक्सफर्ड रुग्णालयात रेफर करण्यात आले. ऑक्सफर्ड रुग्णालयाच्या डॉक्टरांनी तपासणी केली असता, तिच्या शरीरात पारा या धातूचे विष पसरल्याचे निष्पन्न झाले. शस्त्रक्रिया करून नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले, ज्यात पारा असल्याचे समोर आले.
डॉक्टरांनी सांगितले की, विष तिच्या संपूर्ण शरीरात पसरले होते आणि त्यामुळे तिचे मूत्रपिंड आणि इतर अनेक अवयवांना गंभीर नुकसान पोहोचले. एका महिन्याच्या उपचारानंतर तिला व्हिक्टोरिया रुग्णालयात हलवण्यात आले. तिथे तिला डायलिसिसवर ठेवण्यात आले, पण नऊ महिन्यांच्या संघर्षानंतर तिची प्रकृती अधिकच बिघडली आणि तिचा मृत्यू झाला.
पती आणि वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल
विद्याने तिच्या मृत्यूपूर्वी पोलिसांना दिलेल्या जबाबात स्पष्टपणे सांगितले की, पती बसवराजने वडिलांच्या मदतीने तिला ठार मारण्याच्या हेतूने शरीरात पारा इंजेक्ट केला. या विषामुळे नऊ महिने वेदना सहन केल्यानंतर तिचा मृत्यू झाला. विद्याच्या निवेदनावरून, २३ नोव्हेंबर २०२५ रोजी अट्टीबेले पोलीस स्टेशनमध्ये आरोपी पती बसवराज आणि सासरे मारिस्वामाचारी यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला असून, पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.