हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2025 00:27 IST2025-08-15T00:26:01+5:302025-08-15T00:27:07+5:30
हॉटेलमधून मरीन पोलिसांना कॉल आला की, रुममधून दुर्गंधी येतेय. त्यामुळे पोलीस घटनास्थळी पोहोचले. दरवाजा तोडण्यात आला. आत गेल्यानंतर जे दृश्य नजरेस पडले, ते हादरवून टाकणारं होतं.

हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
ते दोघे पर्यटक म्हणून हॉटेलमध्ये आले होते. हॉटेलमधील रुममध्ये ९ ऑगस्टपासून राहत होते. पण, अचानक गोष्टी बदलल्या. रुममधून दोघांचं येणं-जाणं बंद झालं. काही दिवसांनी रुममधून दुर्गंधीच येऊ लागली. त्यामुळे हॉटेलमधील कर्मचाऱ्यांना आणि मॅनेजरला संशय आला. त्यांनी लागलीच मरीन पोलिसांना कॉल केला आणि माहिती दिली. पोलीस आल्यानंतर रुम उघडण्यात आली, तेव्हा आतमध्ये एक महिला आणि पुरुषाचा मृतदेह आढळून आला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
ही घटना घडली आहे पुरीमधील एका हॉटेलमध्ये. हॉटेलमध्ये एका महिला आणि पुरुषाचा मृतदेह कुजायला लागलेल्या अवस्थेत सापडला. पुरुष आणि महिला पश्चिम बंगालमधील असल्याचे पोलिसाच्या प्राथमिक तपासातून समोर आले.
हॉटेलमध्ये काय घडले?
पुरीमधील चक्र तीर्थ रोडवर हॉटेल ताज आहे. हॉटेलमधील एका रुममधून तीव्र दुर्गंधी येऊ लागली. तेव्हा हॉटेलच्या व्यवस्थापनाने मरीन पोलीस ठाण्यात कॉल करून याची माहिती दिली.
दरवाजा आतमधून बंद होता. त्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांनी दरवाजा तोडला. पोलीस रुममध्ये गेले तेव्हा आतील दृश्य थरकाप उडवणारे होते. पुरुष आणि महिला गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकलेले होते.
हॉटेलच्या व्यवस्थापनाने सांगितले की, ते दोघेही ९ ऑगस्ट रोजी हॉटेलमध्ये आले होते. मरीन पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत ते पश्चिम बंगालचे असल्याचे कळले. त्यानंतर तेथील पोलिसांना कॉल करून त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत याची माहिती पोहचवण्यात आली.
पोलिसांनी दोघांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. रुमची झाडाझडती घेण्यात आली, मात्र सुसाईड नोट आढळून आली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. दोघांनी आत्महत्या का केली, याचा तपास आता पोलिसांनी सुरू केला आहे.