"मला न्याय हवाय, पती-मुलाला लोखंडी रॉडने मारहाण..."; भाजपा महिला नेत्याचा रस्त्यावर ठिय्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 18:39 IST2025-10-24T18:37:40+5:302025-10-24T18:39:12+5:30
उत्तर प्रदेशातील मिर्झापूरमध्ये रस्त्यावर निदर्शनं करणाऱ्या भाजपाच्या महिला नेत्या सरिता सिंह यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

फोटो - आजतक
उत्तर प्रदेशातील मिर्झापूरमध्ये रस्त्यावर निदर्शनं करणाऱ्या भाजपाच्या महिला नेत्या सरिता सिंह यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पोलीस त्यांच्या पतीला आणि मुलाला मारहाण करणाऱ्यांवर कोणतीही कारवाई करत नसून गुन्हेगारांना संरक्षण देत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
विंध्याचल पोलीस स्टेशन परिसरातील इंद्रावती रुग्णालयात ही घटना घडली. रुग्णालयाचे मार्केटिंग मॅनेजर शैलेंद्र सिंह आणि रुग्णालयाबाहेर चहाचा टपरी चालवणाऱ्या राजेश यादव यांच्यात पैशावरून वाद झाला. हा वाद हाणामारीपर्यंत वाढला, ज्यामध्ये शैलेंद्र सिंह आणि त्यांचा मुलगा जखमी झाला.
घटनेची माहिती मिळताच, भाजपा शहर मंत्री सरिता सिंह घटनास्थळी पोहोचल्या आणि त्यांनी आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी करत निदर्शनं सुरू केली. त्यांनी मिर्झापूर-प्रयागराज महामार्गावर धरणे आंदोलन केले. गोंधळा दरम्यान कोणीतरी चहाआरोपीच्या टपरीला आग लावली.
सरिता सिंह यांनी आरोप केला की, पोलीस गुन्हेगारांना संरक्षण देत आहेत. त्या म्हणाल्या, "माझ्या पती आणि मुलाला लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली, परंतु मी ११२ वर फोन केल्यानंतरही पोलिसांनी आरोपींना पळून जाऊ दिलं. भाजपाच्या राजवटीत सपा राज्य करत आहेत. मला न्याय हवा आहे."
शहर सीओ विवेक जावाला यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांमध्ये हाणामारी झाली. शैलेंद्र सिंह यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात येत आहे आणि कायदेशीर कारवाई केली जात आहे. जखमी वडील आणि मुलावर इंद्रावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत.