खळबळजनक! थारसाठी पत्नीची हत्या, हुंड्यासाठी पती झाला हैवान; भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 12:05 IST2025-11-17T12:04:54+5:302025-11-17T12:05:35+5:30
राजस्थानमधील भरतपूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

फोटो - आजतक
राजस्थानमधील भरतपूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सेवर पोलीस स्टेशन परिसरातील गणेश कॉलनीत राहणाऱ्या प्रियंकाचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर पतीसह सासरच्या लोकांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. प्रियंकाच्या वडिलांनी तिचा पती आकाश, जो आधी भाजपा युवा मोर्चाचा जिल्हा सरचिटणीस होता त्यावर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
नदबई पोलीस स्टेशन परिसरातील लुहासा गावातील रहिवासी असलेले प्रियंकाचे वडील ओमप्रकाश यांनी सांगितलं की, २४ नोव्हेंबर २०१८ रोजी त्यांची मुलगी प्रियंकाचं लग्न आकाशशी मोठ्या थाटामाटात झालं होतं. लग्नात सुमारे २० लाख रुपये खर्च करण्यात आले होते, परंतु तरीही लग्नानंतर लगेचच प्रियंकाचा हुंड्यासाठी छळ करण्यात आला. ओमप्रकाश यांच्या मते, आकाश आणि त्याचे कुटुंब थारची मागणी करून प्रियंकाचा सतत मानसिक आणि शारीरिक छळ करत होते.
ओमप्रकाश म्हणाले की, त्यांना एक फोन आला होता ज्यामध्ये त्यांना कळवण्यात आलं की त्यांच्या मुलीचा मृत्यू झाला आहे आणि तिचे सासरचे लोक कोणालाही न कळवता शांतपणे तिच्यावर अंत्यसंस्कार करत आहेत. त्यांनी ताबडतोब पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी कारवाई केली, मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला.
सेवर पोलीस स्टेशनचे अधिकारी सतीश चंद यांनी सांगितलं की, पोलिसांना एका महिलेच्या संशयास्पद मृत्यूची माहिती मिळाली आणि सासरचे लोक गुपचूप मृतदेह अंत्यसंस्कारासाठी घेऊन जात होते. पोलिसांनी घटनास्थळी येऊन कारवाई केली, घटनास्थळावरून पुरावे गोळा करण्यासाठी एफएसएल टीमला बोलावलं. पोलीस सध्या सर्व बाजूंनी या प्रकरणाचा तपास करत आहेत.
मुलीच्या कुटुंबाचा आरोप आहे की प्रियंकाची हत्या हुंड्यासाठी झाली आहे. कुटुंबाचे म्हणणं आहे की, त्यांच्या मुलीने छळाची माहिती दिली होती आणि गेल्या काही महिन्यांत तिच्यावर दबाव वाढला होता. सध्या ते शवविच्छेदन अहवाल आणि एफएसएल तपासणीची वाट पाहत आहे, ज्याच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल.