सॉफ्टवेअर इंजिनीअरनं बँकर पत्नीवर 4 गोळ्या झाडल्या, मग स्वतःच पोलीस ठाण्यात केलं सरेंडर! नेमकं प्रकरण काय...?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 10:20 IST2025-12-24T10:18:48+5:302025-12-24T10:20:08+5:30
यानंतर, पोलिसांनी बीएनएस (BNS)च्या कलम १०३ अंतर्गत गुन्हा दाखल करत, तपास सुरू केला आहे.

सॉफ्टवेअर इंजिनीअरनं बँकर पत्नीवर 4 गोळ्या झाडल्या, मग स्वतःच पोलीस ठाण्यात केलं सरेंडर! नेमकं प्रकरण काय...?
बेंगळुरू येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका ४० वर्षांच्या इंजिनीअर तरुणाने विभक्त राहत असलेल्या पत्नीला गोळ्या झाडून ठार केले आणि स्वतःच पोलीस ठाण्यात जाऊन सरेंडर केले.
यासंदर्भात माहिती देताना पुलीस अधिकारी म्हणाले, पीडिता, भुवनेश्वरी (39), युनियन बँक ऑफ इंडियाच्या बसवेश्वरननगर ब्रांचमध्ये असिस्टंट मॅनेजर म्हणून कार्यरत होती. ती कामावरून घरी परतत असतानाच आरोपी बालामुरुगनने सायंकाळी 6.30 ते 7 वाजण्याच्या सुमारास मगाडी रोडजवळ तिला रोखले आणि तिच्यावर अगदी जवळून चार गोळ्या झाडल्या. यानंतर तिला शानबाग रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तेथे पोहोचल्यानंतर तिला मृत घोषित करण्यात आले.
पत्नीच्या चारित्र्यावर संशय -
बालामुरुगन आणि भूवनेश्वरी यांना दोन मुलेही आहेत. २०११ मध्ये विवाहबंधनात अडकलेले हे जोडपे कौटुंबिक वादामुळे गेल्या १८ महिन्यांपासून एकमेकांपासून वेगळे राहत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. पतीपासून दूर राहण्याच्या प्रयत्नात भुवनेश्वरी सहा महिन्यांपूर्वी व्हाईटफिल्डहून राजाजीनगर येथे शिफ्ट झाली होती. मात्र, बालामुरुगनने तिचा पत्ता शोधला. विशेष म्हणजे तिच्यावर नजर ठेवण्यासाठी तो चार महिन्यांपूर्वीच केपी अग्रहारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चोलुरपाल्या येथे राहण्यासाटी आला होता. महत्वाचे म्हणजे, त्याने गेल्य एका आठवड्यापूर्वीच भुवनेश्वरीला घटस्फोटासाठी कायदेशीर नोटीसही पाठवली होती.
बीएनएस (BNS)च्या कलम १०३ अंतर्गत गुन्हा दाखल -
पश्चिम विभागाचे डीसीपी एस. गिरीश यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पूर्वी एका खासगी आयटी कंपनीत नोकरी करत होता. मात्र गेल्या चार वर्षांपासून तो बेरोजगार होता. आरोपी आणि पीडिता हे दोघेही तामिळनाडूच्या सालेम जिल्ह्यातील रहिवासी आहेत. पत्नीवर हल्ला केल्यानंतर बालामुरुगन मगाडी रोड पोलीस ठाण्यात गेला आणि त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली देत स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केले. त्याने वापरलेले शस्त्रही पोलिसांनी जप्त केले आहे. यानंतर, पोलिसांनी बीएनएस (BNS)च्या कलम १०३ अंतर्गत गुन्हा दाखल करत, तपास सुरू केला आहे.