Attempted to sexually assault a 4-year-old girl by throwing her in a sack | दैव बलवत्तर म्हणून ती जिवंत, ४ वर्षाच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार करून गोणीत भरून दिले होते टाकून

दैव बलवत्तर म्हणून ती जिवंत, ४ वर्षाच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार करून गोणीत भरून दिले होते टाकून

ठळक मुद्देवालिव पोलिसांना मुलगी सापडताच तिच्यावर प्राथमिक उपचार केले. भाईंदर पश्चिमेस नेताजी सुभाषचंद्र बोस मैदाना बाहेरील मुख्य रस्त्यावर बेकायदेशी बस, डम्पर आदी वाहने उभी केली जातात.

मीरारोड - बसमध्ये खेळताना चुकून आतच राहिलेल्या ४ वर्षांच्या मुलीवर बस मध्ये लैंगिक अत्याचार करणाऱ्या मूळच्या उत्तर प्रदेशच्या बस चालकास भाईंदर पोलिसांनी वसईतून अटक केली आहे. तर मुलगी मेली असल्याचे समजून तिला गोणीत भरून फेकून देण्यात आले होते. पण दैव बलवत्तर म्हणून ती जिवंत होती. वालिव पोलिसांना मुलगी सापडताच तिच्यावर प्राथमिक उपचार केले. 

भाईंदर पश्चिमेस नेताजी सुभाषचंद्र बोस मैदाना बाहेरील मुख्य रस्त्यावर बेकायदेशी बस, डम्पर आदी वाहने उभी केली जातात. त्या विरोधात तक्रारी असून देखील कारवाई केली जात नाही. रविवारी येथे उभ्या असलेल्या एका लक्झरी बसमध्ये लहान मुले खेळत होती. दुपारी १ च्या सुमारास बसच्या ३४ वर्षीय चालकाने बस सुरु केल्याने अन्य मुले बाहेर पडली, पण ४ वर्षाची मुलगी आतच राहिली. चालक बस वसईला घेऊन निघाला.  

बस मध्ये सदर मुलगी पाहून त्याने तिच्यावर बसमध्येच लैंगिक अत्याचार केला . ती ओरडू लागल्याने तिला ठार मारण्यासाठी गळा दाबला. ती बेशुद्ध पडली असता मेली असल्याचे समजून चालकाने प्लॅस्टिकच्या गोणीत तिला भरले व ती गोणी वळीव पोलीस ठाणे हद्दीतील फादरवाडी भागात रस्त्या लगत टाकून तो वसईला पळाला. 

सायंकाळी सदर गोणीतून मुलीचा आवाज येऊ लागल्याचे लोकांच्या निदर्शनास येताच त्यांनी वालिव पोलिसांना याची माहिती दिली. पोलीस निरीक्षक विलास चौगुले यांनी त्वरित पोलिसांना तिच्यावर प्राथमिक उपचार करायला पाठवले व नंतर मुंबईतील रुग्णालयात दाखल करून तिचा जीव वाचवला. मुलीची माहिती पोलिसांच्या ग्रुपना पाठवली. त्यावेळी सदर मुलीचे भाईंदर येथून अपहरण झाले असल्याचे समजले. 

दरम्यान मुलीच्या आईने ती सापडली नाही म्हणून भाईंदर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव सह उपनिरीक्षक किरण वळवी व मनीषा पाटील आणि पोलीस पथकाने मुलीसह बस चालकाचा शोध चालवला होता. पोलिसांना बस चालक हा वसईच्या माणिकपूर भागात असल्याचे कळताच वळवी व पथकाने वसईतून त्याला पकडले. आरोपीने लैंगिक अत्याचार करून तिला मारण्याचा प्रयत्न केल्याचे कबुल केले असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. त्याला सोमवार पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.

सदर आरोपी हा मूळचा उत्तर प्रदेशचा आहे. तो सांताक्रूझला रहात असून बसने वसईवरून कर्मचाऱ्यांना मुंबई ला नेणे व परत वसईला सोडण्याचे काम तो करत होता. पूर्वी काही महिने तो भाईंदरला रहायला होता. रविवारी सुट्टी असल्याने खाण्या - पिण्यासाठी तो भाईंदरला आला होता असे सूत्रांनी सांगितले. 

 

Web Title: Attempted to sexually assault a 4-year-old girl by throwing her in a sack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.