सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2026 11:18 IST2026-04-10T11:16:32+5:302026-04-10T11:18:25+5:30
आंध्र प्रदेश लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत देवस्थान विभागाच्या सहाय्यक आयुक्त कलिंगिरी शांती यांना बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात अटक केली आहे.

फोटो - ndtv.in
आंध्र प्रदेशलाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मोठी कारवाई करत देवस्थान विभागाच्या (Endowments Department) सहाय्यक आयुक्त कलिंगिरी शांती यांना बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात अटक केली आहे. एसीबीने ७ एप्रिल रोजी विजयावाडा आणि विशाखापट्टणम येथे एकाच वेळी छापे टाकून कोट्यवधी रुपयांच्या जंगम आणि स्थावर मालमत्तेचा पर्दाफाश केला.
एसीबी अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शांती यांनी त्यांच्या उत्पन्नापेक्षा कितीतरी पटीने अधिक मालमत्ता जमा केल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर विजयावाडा रेंजच्या एसीबी पथकाने गुन्हा दाखल करून चार ठिकाणांवर छापे टाकले. यामध्ये आरोपीचं निवासस्थान, त्यांच्या आईचं कपड्यांचं दुकान, बहिणीचं घर आणि विशाखापट्टणममधील एका मालमत्तेचा समावेश आहे.
कोट्यवधींची मालमत्ता जप्त
छापेमारी दरम्यान तपास अधिकाऱ्यांना अनेक महत्त्वाची कागदपत्रं सापडली आणि मोठ्या प्रमाणात मालमत्तेचा तपशील समोर आला. एसीबीने विशाखापट्टणममध्ये एक निवासी फ्लॅट, विजयावाड्यात एक G+2 इमारत, ७७० ग्रॅम सोन्याचे दागिने, ३ किलो चांदी, १.१५ लाख रुपये रोख आणि ३ लाखांच्या बँक ठेवींचा शोध लावला आहे. याशिवाय एक फोक्सवॅगन पोलो कार, मोटारसायकल, इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आणि इतर मौल्यवान वस्तूही जप्त करण्यात आल्या आहेत.
कलिंगिरी शांती यांची भरती २०२० मध्ये आंध्र प्रदेश लोकसेवा आयोगाच्या (APPSC) माध्यमातून झाली होती. त्यांनी विशाखापट्टणम आणि विजयावाडा येथे आपली काम केलं आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या जुलै २०२४ ते मार्च २०२६ या कालावधीत निलंबित होत्या आणि छापेमारीच्या वेळी नवीन पोस्टिंगची वाट पाहत होत्या.
अटक करून कारागृहात रवानगी
एसीबीने शांती यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम १३(२) आणि १३(१)(b) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे, जे लोकसेवकांकडे उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता आढळण्याशी संबंधित प्रकरण आहे. अटक केल्यानंतर त्यांना विजयावाडा येथील एसीबी प्रकरणांच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात आले, जिथून त्यांना २१ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर त्यांची रवानगी जिल्हा कारागृहात करण्यात आली आहे.