४ अफेअर्स, व्यसनाचं नाटक अन्...; होणाऱ्या पतीच्या जाचाला कंटाळून तरुणीने स्वतःला संपवलं; 'त्या' चिठ्ठीत मांडली व्यथा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2026 16:31 IST2026-04-25T14:41:51+5:302026-04-25T16:31:47+5:30
बंगळुरुमध्ये होणाऱ्या पतीच्या त्रासाला कंटाळून एका तरुणीने स्वतःला संपवल्याची घटना घडली.

४ अफेअर्स, व्यसनाचं नाटक अन्...; होणाऱ्या पतीच्या जाचाला कंटाळून तरुणीने स्वतःला संपवलं; 'त्या' चिठ्ठीत मांडली व्यथा
Crime News: एका तरुणीसाठी लग्न हेच स्वप्न मृत्यूचे कारण ठरले आहे. बंगळुरूमध्ये स्थायिक असलेल्या सॉफ्टवेअर इंजिनिअर पतीने लग्नास नकार देण्यासाठी मानसिक छळ केल्यामुळे रेहाना (वय २६) या तरुणीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी रेहानाने लिहिलेल्या १२ पानांच्या सुसाईड नोटने पोलीस प्रशासनासह सर्वांनाच धक्का बसला आहे.
साखरपुडा झाला, पण...
रेहानाने नुकतेच तिचे एमएससीचे शिक्षण पूर्ण केले होते. १५ फेब्रुवारी रोजी तिचा साखरपुडा सध्या बंगळुरूमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या शाहजहान याच्याशी झाला होता. या वर्षी ऑगस्ट महिन्यात दोघांचे लग्न ठरले होते. सुरुवातीला दोघांमध्ये सर्व काही सुरळीत होते, तासन् तास फोनवर गप्पा व्हायच्या. मात्र, गेल्या तीन आठवड्यांपासून शाहजहानच्या वागण्यात अचानक बदल झाला.
'माझं तुझ्यावर प्रेम नाही, माझे ४ अफेअर्स होते'
रेहानाने आपल्या सुसाईड नोटमध्ये शाहजहानच्या बदललेल्या वागण्यावर सविस्तर लिहून ठेवले. "शाहजहान मला म्हणायचा की माझ्या मनात तुझ्याबद्दल काहीही भावना उरल्या नाहीत. मला तू अजिबात आवडत नाहीस. माझे यापूर्वी चार महिलांसोबत प्रेमसंबंध होते," असं तिने म्हटलं. इतकेच नाही तर, मला दारूचे व्यसन आहे आणि वडिलांच्या दबावामुळे मी हे लग्न करत आहे, असे सांगून त्याने रेहानाला स्वतःहून लग्न मोडण्यासाठी दबाव टाकला.
१२ पानांची सुसाईड नोट आणि पालकांचा आक्रोश
बुधवारी कडप्पा येथील पटेल स्ट्रीटवरील राहत्या घरी रेहानाचा मृतदेह आढळला. "शाहजहानने जाणीवपूर्वक आमच्या मुलीला मानसिक नैराश्यात ढकलले. त्याने तिला लग्नासाठी पूर्णपणे नापसंत असल्याचे सांगून अपमानित केले. तिला झालेल्या या त्रासामुळेच तिने हे टोकाचे पाऊल उचलले," असा आरोप रेहानाच्या पालकांनी केला आहे. तिने लिहिलेल्या १२ पानांच्या पत्रात तिच्यावर झालेला अन्याय सविस्तरपणे मांडला आहे.
सॉफ्टवेअर इंजिनिअर पतीसह सासरचे अटकेत
याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. रेहानाच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी मुख्य आरोपी शाहजहान आणि त्याचे वडील एम. वीरैया व आई एम. वाहिदा यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.