पडघा बोरिवलीतील छाप्यांत १९ मोबाइल जप्त; आक्षेपार्ह मेसेजेसप्रकरणी फोरेन्सिक पडताळणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 06:06 IST2025-06-04T06:06:00+5:302025-06-04T06:06:39+5:30

दुसरी फळी बोरिवलीत

19 mobiles seized in raids in Padgha Borivali; Forensic verification in case of objectionable messages | पडघा बोरिवलीतील छाप्यांत १९ मोबाइल जप्त; आक्षेपार्ह मेसेजेसप्रकरणी फोरेन्सिक पडताळणी

पडघा बोरिवलीतील छाप्यांत १९ मोबाइल जप्त; आक्षेपार्ह मेसेजेसप्रकरणी फोरेन्सिक पडताळणी

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) ठाणे ग्रामीण पोलिसांसह ठाणे जिल्ह्यातील पडघा व बोरिवली गावांत छापेमारी केली. यावेळी १९ माेबाइल, तलवार, चाॅपर, छऱ्याची एअरगन आणि जमिनीची आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त करण्यात आली आहे. मोबाइलद्वारे राष्ट्रविरोधी, चिथावणी देणाऱ्या संदेशांची देवाणघेवाण झाल्याचा संशय आहे. हे मोबाइल फोन फोरेन्सिक लॅबमध्ये पाठविले आहेत. अहवाल आल्यानंतर कोणते संदेश पाठविण्यात आले आणि त्यामागे  काय हेतू होता, हे स्पष्ट होणार आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर बाेरिवलीत काही स्लीपर सेल कारवाया करत असल्याची गोपनीय माहिती एटीएसला महिन्याभरापूर्वी मिळाली. त्या आधारे या भागात महिन्याभरापासून एटीएसच्या पथकांची विविध प्रकारे चाचपणी सुरू हाेती. मुंबई बाॅम्बस्फाेटातील आराेपी साकिब नाचणचे नातेवाईक आणि साथीदार अशा २२ जणांची माहिती मिळाली हाेती. त्याच आधारावर  एटीएसने २२ पथके तयार करून २ जून राेजी पहाटे २ ते ३ वाजल्यापासून काेम्बिंग ऑपरेशन राबवले. या कारवाईत या २२ पैकी १६ जणांची चाैकशी झाली.

सोमवारी एटीएस आणि ठाणे ग्रामीण यांनी केलेल्या संयुक्त कारवाईनंतर शस्त्रास्त्र कायद्यान्वये दोन गुन्हे दाखल केल्याची माहिती आहे. तसेच, दोघाजणांना आरोपी करण्यात आले आहे.  

दुसरी फळी बोरिवलीत

देशविघातक कृत्यांसाठी दुसरी फळी बोरिवलीत तयार हाेत असल्याची माहिती एटीएसकडे हाेती. त्याच्या सहकाऱ्यांकडून चिथावणीखाेर आणि जिहादी भाषणे, तसेच साकीबला आदर्श मानणे आणि साकीबवरील कारवाईचा दिवस काळा दिवस पाळणे, तसेच काही स्लीपर सेलही कार्यरत असणे, अशा अनेक संशयास्पद हालचालींमुळे या ठिकाणी कारवाई झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: 19 mobiles seized in raids in Padgha Borivali; Forensic verification in case of objectionable messages