‘खर्रा मिळणार असेल तरच शाळेत येईन’; म्हणणारा योगेश झाला फासेपारधी समाजातील पहिला सेट उत्तीर्ण विद्यार्थी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2025 11:30 IST2025-09-04T11:30:05+5:302025-09-04T11:30:29+5:30
योगेश शाळेत आल्यानंतर रामदेव बाबांच्या योगा कार्यक्रमाने प्रेरित झाला. औपचारिक प्रशिक्षणाशिवाय त्याने जिल्हा व विभागीय, राज्यस्तरावर पहिला क्रमांक पटकावला. कमरेचे ऑपरेशन करावे लागल्यामुळे त्याचे राष्ट्रीय स्तरावर जाण्याच योगा थांबला.

‘खर्रा मिळणार असेल तरच शाळेत येईन’; म्हणणारा योगेश झाला फासेपारधी समाजातील पहिला सेट उत्तीर्ण विद्यार्थी
- प्राची पाटील
छत्रपती संभाजीनगर : ‘खर्रा मिळणार असेल तरच शाळेत येईन…’ ही अट ठेवत ज्या मुलाने प्रश्नचिन्ह शाळेत पहिले पाऊल ठेवले तोच फासेपारधी समाजातील योगेश मंजू पवार आज अर्थशास्त्र विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण झाला. योगशास्त्रात राष्ट्रीय पातळीवर जाण्याचे स्वप्न शारीरिक व्याधीमुळे भंगले. मात्र, हार न मानता तो पुन्हा स्वत:च्या पायांवर उभा राहिला. तो म्हणतो, वडील आजही शिकार करून घर चालवतात. ही परिस्थिती बदलणार आहे.
योगशे अमरावतीतील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शिवरा गावचा. ४थीपर्यंत शिक्षणाचा कुठलाही गंध नव्हता. त्याच्या अंधकारमय आयुष्यात प्रकाश बनून ‘प्रश्नचिन्ह’चे मतिन भोसले आले. त्याला शाळेत नेण्यासाठी त्यांनी, ‘चल, तुला खर्रा मिळेल’ सांगत शाळेत आणले. मात्र, त्यानंतर तू असाच व्यसनात राहिलास तर तुझ्या समाजाला यातून कोण बाहेर काढणार? या प्रश्नाने त्याच्यात अंतर्बाह्य बदल झाला.
योगेश शाळेत आल्यानंतर रामदेव बाबांच्या योगा कार्यक्रमाने प्रेरित झाला. औपचारिक प्रशिक्षणाशिवाय त्याने जिल्हा व विभागीय, राज्यस्तरावर पहिला क्रमांक पटकावला. कमरेचे ऑपरेशन करावे लागल्यामुळे त्याचे राष्ट्रीय स्तरावर जाण्याच योगा थांबला.
फासेपारधी समाजातील मुलांसाठी योगेश प्रेरणा ठरेल. इतर मुलेही त्याच्यामुळे पुढे येतील. या समाजातील मुलीही शिकत आहेत. ही एक सकारात्मक सुरुवात आहे.
अजय किंगरे, मैत्रमांदियाळी प्रतिष्ठान
आता सरकारी नोकरी करणार
‘लोकमत’शी बोलताना तो म्हणाला, ‘माझे कुटुंब आजही तितर, बाट्या पक्ष्यांची शिकार करून जगते.
आम्ही झोपडपट्टीत राहतो. मी कोणती परीक्षा उत्तीर्ण झालो, तेदेखील घरच्यांना कळत नाही.
त्यांना इतकेच माहिती आहे की आपला मुलगा साहेब झाला, तो आता सरकारी नोकरी करणार.’
प्राध्यापक होणारा समाजातला पहिलाच
१०वीला ८०, १२वीला ८५ टक्के त्याने मिळवले. दरम्यान वक्तृत्व, रांगोळी स्पर्धांमध्ये तो सातत्याने चमकत होता. लोकबिरादरी प्रकल्प, हेमलकसा येथे शिक्षण घेताना आमटे कुटुंब व देणगीदारांचा आधार मिळाला.
सुरेश तायडे, अजय किंगरे, डॉ. विकास आमटे, प्रकाश आमटे आदींच्या मदतीने त्याने शिक्षण सुरू ठेवले. जळगावला ‘दीपस्तंभ’मध्ये अभ्यास केला. ३ वर्षांच्या परिश्रमानंतर आता योगेशने अर्थशास्त्र विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण केली.