महानगरपालिकेचे यंदाचे बजेट उत्पन्नाच्या मर्यादेतच

By Admin | Updated: May 29, 2015 01:03 IST2015-05-29T00:51:23+5:302015-05-29T01:03:47+5:30

औरंगाबाद : महानगरपालिकेच्या दरवर्षी फुगत जाणाऱ्या बजेटवर राज्य सरकारने आक्षेप घेतला आहे. त्यामुळे यंदा पालिकेचे बजेट उत्पन्नाच्या मर्यादेतच ठेवण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत.

This year's municipal corporation budget limit | महानगरपालिकेचे यंदाचे बजेट उत्पन्नाच्या मर्यादेतच

महानगरपालिकेचे यंदाचे बजेट उत्पन्नाच्या मर्यादेतच


औरंगाबाद : महानगरपालिकेच्या दरवर्षी फुगत जाणाऱ्या बजेटवर राज्य सरकारने आक्षेप घेतला आहे. त्यामुळे यंदा पालिकेचे बजेट उत्पन्नाच्या मर्यादेतच ठेवण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. परिणामी चालू आर्थिक वर्षाचे बजेट सहाशे कोटींच्या आतच राहणार असल्याचे लेखा विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
महानगरपालिकेकडून प्रत्येक आर्थिक वर्षासाठी उत्पन्न आणि खर्चावर आधारित अंदाजपत्रक तयार केले जाते. परंतु गेल्या पाच- सात वर्षांपासून पालिकेतील सत्ताधारी जमा किंवा उत्पन्नाचा फारसा विचार न करता अवास्तव खर्चाचे बजेट तयार करीत आहेत. त्यामुळे बजेटचा आकार सातत्याने फुगत आहे. गेल्या आर्थिक वर्षात पालिकेतील सत्ताधाऱ्यांनी प्रशासनाच्या बजेटमध्ये वाढ करून ते ७९२ कोटी रुपयांचे केले. परंतु प्रत्यक्षात ४९२ कोटी रुपयांचेच उत्पन्न मिळाले. मागील काही वर्षात अशाच पद्धतीने उत्पन्नापेक्षा जास्त खर्चाचे बजेट बनविले गेले आहे. त्यामुळे राज्य सरकारने नुकतेच पालिका आयुक्तांना पत्र पाठवून त्याविषयी विचारणा केली आहे. सरकारनेच बोट ठेवल्यामुळे आता पालिकेच्या लेखा विभागाने चालू वर्षासाठी आटोपशीर बजेट तयार करण्याची तयारी चालविली आहे. चालू वर्षासाठीचे बजेट बनविण्याचे काम सुरू झाले असून येत्या एक-दोन महिन्यांत ते सर्वसाधारण सभेसमोर ठेवले जाणार आहे. मनपा निवडणुकीमुळे प्रशासनाने याआधी एप्रिल ते जून या काळासाठी दोनशे कोटी रुपयांचे लेखानुदान मंजूर करून घेतले होते. आता उर्वरित काळासाठी बजेट सर्वसाधारण सभेसमोर ठेवले जाणार आहे. लेखानुदानासह हे बजेट एकूण सहाशे कोटींच्या आत राहील असे पालिकेतील अधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: This year's municipal corporation budget limit