यंदाचा केंद्रीय युवक महोत्सव डिसेंबरमध्ये

By Admin | Updated: September 8, 2014 00:34 IST2014-09-08T00:18:32+5:302014-09-08T00:34:27+5:30

औरंगाबाद : यंदाचा केंद्रीय युवक महोत्सव डिसेंबर महिन्यात घेण्याचा निर्णय डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने घेतला आहे.

This year's Central Youth Festival will be held in December | यंदाचा केंद्रीय युवक महोत्सव डिसेंबरमध्ये

यंदाचा केंद्रीय युवक महोत्सव डिसेंबरमध्ये

औरंगाबाद : यंदाचा केंद्रीय युवक महोत्सव डिसेंबर महिन्यात घेण्याचा निर्णय डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने घेतला आहे. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे विद्यापीठाला हा निर्णय घ्यावा लागला.
यासंदर्भात विद्यार्थी कल्याण विभागाच्या संचालिका डॉ. चेतना सोनकांबळे यांनी सांगितले की, यंदाही विद्यापीठ परिसरातच केंद्रीय युवक महोत्सव घेतला जाईल. त्यादृष्टीने सर्व संलग्नित महाविद्यालयांना पूर्वतयारी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जास्तीत जास्त महाविद्यालयांनी या युवक महोत्सवात आपले संघ पाठविण्याबाबत कळविण्यात आले आहे.
यासंदर्भात सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता आता कधीही लागू शकते. त्यामुळे युवक महोत्सव नेमक्या कोणत्या तारखेला घ्यायचा, त्याबाबत विद्यापीठाला निश्चित निर्णय घेण्यास अडचण येत आहे. आचारसंहितेची तारीख जाहीर झाल्यास युवक महोत्सवाची तारीख निश्चित केली जाईल. गेल्या वर्षी केंद्रीय युवक महोत्सव विद्यापीठ परिसरातच घेण्यात आला होता. या महोत्सवासंदर्भात अलीकडेच सल्लागार समितीची बैठक व कार्यशाळाही घेण्यात आली. केंद्रीय युवक महोत्सवात सहभागी होण्यासाठी सर्व महाविद्यालयांना बंधनकारक करण्यात आले आहे. जे महाविद्यालय या महोत्सवात सहभागी होणार नाही, त्यांच्याविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णयही विद्यापीठ प्रशासनाने घेतला आहे. कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा पहिलाच महोत्सव होणार आहे, हे विशेष!

Web Title: This year's Central Youth Festival will be held in December