औरंगाबाद: वैजापूर तालुक्यातील बोरसरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील आशा कार्यकर्ती सुरेखा गाडेकर (वय ५२) या महिलेचा मृत्यू कोरोना लसीकरणामुळे झाला नसून हार्टअटॅकने झाल्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी चव्हाण यांनी लोकमतशी बोलताना सांगितले, सुरेखा गाडेकर यांना २९ जानेवारी रोजी लस दिली होती. उपजिल्हा रुग्णालय, गंगापूर येथे लसीकरण केल्यानंतर त्या महिलेला मळमळ सुरू झाली. त्या दिवशी डॉक्टरांनी तपासणी करून उपचार केले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ईसीजी करण्यात आले. मागील एक वर्षापासून सदर महिला हायपरटेन्शनमुळे औषधी घेत होती. हे सगळे रेकॉर्डवर आहे. लसीकरणानंतर रिअॅक्शन आल्यानंतर तपासणी केली असता मधुमेह असल्याचे समोर आले. त्यानंतर घाटी रुग्णालयात उपाचारासाठी महिलेला पाठविण्याचे गंगापूर येथील डॉक्टरांनी सांगितले. ती महिला घाटीऐवजी शिर्डीला उपचारासाठी गेली. दरम्यान, त्या महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर त्या महिलेचे शवविच्छेदन दोन डॉक्टरांनी औरंगाबादेत केले. शवविच्छेदनानंतर एईएफआय समितीची बैठक झाली. त्यात शवविच्छेदनाचा अहवाल तपासला. या बैठकीत डब्ल्यूएचओचे डॉ. मुजीब, डॉ. केंजाळकर, डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य आदींसह ह्वदयरोग तज्ज्ञ, मेंदूविकार तज्ज्ञ, पॅथॉलॉजिस्ट, मायक्रोबायोलॉजिस्ट, न्यायवैद्यक तज्ज्ञांसह आरोग्य उपसंचालकांचा समावेश होता. हार्टअटॅकने सदरील महिलेचा मृत्यू झाल्याचा समितीने निष्कर्ष काढला आहे. आजवर ११६ लसीकरण सत्र झाले आहेत. १२ हजारांपैकी ८ हजार २०० जणांनी लस घेतली आहे. १९४ लोकांना ईएफआय आलेले आहे. त्यात कुणालाही मेजर लक्षणे नाहीत. असा दावा जिल्हाधिकाऱ्यांनी केला आहे.
तज्ज्ञ डॉक्टरांची आज बैठक
लसीकरणाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या उपस्थितीत तज्ज्ञ डॉक्टरांची सोमवारी सकाळी तातडीची बैठक होणार आहे. फ्रंटलाईनवरील कोरोना योद्ध्यांना लस देण्याबाबत शासनाने नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यावर बैठकीत चर्चा होईल.