छत्रपती संभाजीनगरचे 'लबाडांनो पाणी द्या' आंदोलन भाजपला का लागलं? अंबादास दानवेंचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 18:32 IST2025-05-15T18:32:00+5:302025-05-15T18:32:37+5:30
छत्रपती संभाजीनगरातील पाणी प्रश्नांवर आम्ही महिनाभर आंदोलन केले. आमचे आंदोलन घराघरापर्यंत पोहचले आहे: अंबादास दानवे

छत्रपती संभाजीनगरचे 'लबाडांनो पाणी द्या' आंदोलन भाजपला का लागलं? अंबादास दानवेंचा सवाल
छत्रपती संभाजीनगर: आमच्या आंदोलनाविरोधात पत्रकार परिषद घेणाऱ्या भारतीय जनता पक्षाला लबाडांनो पाणी द्या असे आम्ही म्हणालोच नाही, मात्र हे जर त्यांना लागलंं असेल तर आमच्या आंदोलनाच यश आहे, अशा शब्दात विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते आ.अंबादास दानवे यांनी भाजपवर टीका केली. लबाडांनो पाणी द्या हे आंदोलन शहराच्या पाणी वाटप नियोजन कोलमडण्याविरोधात असल्याचे दानवे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
आ.दानवे म्हणाले की,शहर पाणी प्रश्नांवर आम्ही महिनाभर आंदोलन केले. आमचे आंदोलन घराघरापर्यंत पोहचले आहे, यामुळे ते केवळ एका पक्षाचे नव्हे तर जनतेचे आंदोलन झाले आहे. शहराला २४० एमएलडी पाण्याची आवश्यकता आहे. प्रत्यक्षात रोज १४० एमएलडी पाणी पुरवठा होतो. उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन केले तर शहरवासियांना एक,दोन दिवसाआड पाणी मिळू शकते, मात्र मनपा प्रशासक आयपीएल पाहण्यात दंग आहे. पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांवर कोणाचेही नियंत्रण नाही. आम्हाला लबाड म्हणारी पत्रके वाटप करणाऱ्या भाजपही मागील २५ ते ३० वर्ष आमच्यासोबत मनपात सत्तेत होते. विजया राहाटकर, डॉ. भागवत कराड हे महापौर होते. प्रत्येक टर्मला अनेकदा उपमहापौरही त्यांचा असायचा. एवढेच नव्हे तर स्थायी समिती सभापतीही त्यांचे होते. अतुल सावे हे जलसम्राट आहेत, तर मग भाजपला नैतिकदृष्ट्या आमच्यावर टीका करण्याचा अधिकार नसल्याचे दानवे म्हणाले.
१६८० कोटींची योजना २७४० कोटींची कशी झाली
नवीन पाणी पुरवठा योजना १६८० कोटी रुपयांची होती. नंतर ती २७४०कोटी रुपयांची कशी झाली, असा सवाल आ. दानवे यांनी उपस्थित केला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा नंतर ही काम अत्यंत संथगतीने चालू आहे. या योजनेचे काम ३ फेब्रुवारी २०२४ रोजी पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र सत्ताधाऱ्याचा वचक नसल्याने योजनेचे काम दोन वर्ष पूर्ण होऊ शकत नसल्याचे आ.दानवे यांनी नमूद केले.
शुक्रवारी आदित्य ठाकरे यांचा मोर्चा
शहर पाणी प्रश्नांवर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली उद्या शुक्रवारी सायंकाळी साडेचार वाजता हल्लाबोल मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा पैठणगेट मार्गे गुलमंडीवर जाईल.तेथे आयोजित सभेतून समारोप होईल. रिकामे हंडे घेऊन महिला सहभागी होतील, असे आ.दानवे यांनी सांगितले.