कुठे हरवले रक्ताचे नाते? वृद्धाश्रमातील १८१ आईबाबांकडे पोटच्या गोळ्याचा मृत्यूनंतरही कानाडोळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 19:43 IST2025-08-21T19:43:04+5:302025-08-21T19:43:32+5:30
शेकडो आई-बाबांनी मुलांच्या आठवणीतच मिटले डोळे

कुठे हरवले रक्ताचे नाते? वृद्धाश्रमातील १८१ आईबाबांकडे पोटच्या गोळ्याचा मृत्यूनंतरही कानाडोळा
- प्राची पाटील
छत्रपती संभाजीनगर : इटुकल्या हाताने बाबांचे बोट धरून चालताना-खेळताना ती बऱ्याचदा धडपडायची, रडायला लागायची, तेव्हा बाबांनी कडेवर घेतल्याशिवाय ती शांत होत नसे. ती ६ महिन्यांची असताना आई हे जग सोडून गेली. आईची मायाही त्यांनीच लावली. मुलीसाठी आयुष्यभर लग्न केले नाही आणि त्यांच्या शेवटच्या क्षणी मुलगी अंत्यसंस्कारालाही आली नाही. हे एकच उदाहरण नव्हे, तर असे शेकडो अनुभव वृद्धाश्रम चालकांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वृद्धाश्रमात आजवर अशा १८१ वृद्धांचा मृत्यू झाला ज्यांना त्यांची मुले शेवटी पाहायला, भेटायलाही आली नाहीत. सुशिक्षित, उच्चपदस्थ मुलांचाही यात समावेश आहे, हीच खरी शोकांतिका.
मुलांसाठी झिजले...
जालन्यातील एक आजोबा ज्यांनी सायकलवर कपडे विकून दोन्ही मुलांना शिक्षक केले. सतत सायकल चालवल्यामुळे त्यांच्या पाठीत अक्षरश: बाक आला. त्यांच्या उतारवयात मधुमेहामुळे वडिलांना जास्त खायला लागते या कारणामुळे मुलांनी त्यांना मातोश्री वृद्धाश्रमात आणून सोडले. वृद्धाश्रमात आणल्यानंतरही येथील कर्मचाऱ्यांना मुलांनी वडिलांना कमी जेवण देण्यास सांगितले, जेणेकरून त्यांचा लवकर मृत्यू होईल. यावर कर्मचाऱ्याने त्यांची खरडपट्टी काढल्यानंतर ते खजील झाले. ५ वर्षांनी आजोबा गेले. त्यापूर्वी त्यांनी आपले शेवटचे विधी मूळ गावी व्हावेत अशी इच्छा व्यक्त केली होती; पण मुलांनी यालाही नकार दिला. शेवटी लोकलज्जेस्तव ते स्मशानभूमीत आले. मात्र, अंत्यसंस्कार सोडून नातेवाइकांसोबत भांडणातच ते गुंतले. शेवटचे संस्कार वृद्धाश्रमानेच केले.
शेवटी एकटेच
आस्था फाउंडेशनच्या वृद्धाश्रमात राहणारे एक आजोबा ज्यांना मुलगी आणि पत्नीने घर स्वत:च्या नावावर करून घेत हाकलून लावले. कुठे-कुठे भटकल्यानंतर कोण्या एका नातेवाइकाच्या मदतीने ते वृद्धाश्रमात राहायला आले. घरासाठी त्यांनी न्यायालयात दावा दाखल केला. अनेक वर्षे प्रकरण चालले. मात्र, शेवटी निकालाच्या आधीच हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. त्यांचे शेवटचे दर्शन घ्यायलादेखील मुलगी, पत्नी आल्या नाहीत.
अशी आहे संख्या
मातोश्री वृद्धाश्रम : १७० (मागील ३० वर्षांत)
कृपाळू वृद्धाश्रम : ०२ ( मागील ३ वर्षांत)
आधार वृद्धाश्रम : ०३ ( मागील ८ वर्षांत)
माणुसकी वृद्धाश्रम : ०३ ( मागील ३ वर्षांत)
आस्था वृद्धाश्रम : ०३ ( मागील १० वर्षांत)
एकूण- १८१
आपले वडील किंवा आई यांचा मृत्यू झालाय हे आम्ही लगेचच मुलांना कळवतो. अनेकदा ते येत नाहीत, त्यातल्या त्यात जे येतात ते हातही लावत नाहीत. नाकाला फडके बांधून लांब उभे राहतात.
-सागर पागोरे, मातोश्री वृद्धाश्रम