‘राज’सभेसाठी पोलिसांच्या १६ अटी कोणत्या होत्या; प्रत्यक्षात उल्लंघन किती झाले ? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2022 05:00 PM2022-05-03T17:00:59+5:302022-05-03T17:03:52+5:30

राज ठाकरे यांच्या सभेला पोलिसांनी १५ अटींचे पालन करण्याची हमी घेतल्यानंतरच परवानगी दिली होती. त्यातील बहुतांश अटीचे उल्लंघन झाल्याचा ठपका ठेवण्यात येत आहे.

What were the conditions of the police for the ‘Raj’sabha; How many violations actually took place? Find out | ‘राज’सभेसाठी पोलिसांच्या १६ अटी कोणत्या होत्या; प्रत्यक्षात उल्लंघन किती झाले ? जाणून घ्या

‘राज’सभेसाठी पोलिसांच्या १६ अटी कोणत्या होत्या; प्रत्यक्षात उल्लंघन किती झाले ? जाणून घ्या

googlenewsNext

औरंगाबाद : मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या औरंगाबादेतील मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर घेण्यात आलेल्या सभेत घालून दिलेल्या अनेक नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. सोमवारी शहर पोलीस दलातील उपायुक्त अपर्णा गीते, निरीक्षक अविनाश आघाव, गौतम पातारे यांच्यासह इतर अधिकारी सकाळी ९ वाजेपासूनच राज ठाकरे यांच्या सभेत कोणत्या नियमांचे उल्लंघन करण्यात आले, याची छाननी करीत होते. रात्री उशिरापर्यंत छाननी सुरू होती. ठाकरे यांच्या सभेला परवानगी देताना एकूण १५ अटी घालण्यात आल्या होत्या. त्या अटींचे पालन न केल्यास कारवाईचा इशारा देण्यात आलेली १६ वी अट होती. त्यादृष्टीने पोलिसांनी भाषणाची तपासणी केली. त्यानंतर गृह विभागाला दिलेल्या अहवालावरून पोलिसांनी आज राज ठाकरे आणि आयोजकांवर गुन्हा दाखल केला आहे. 

सभेला घातलेल्या अटी
१) कार्यक्रम नियोजित वेळेत पूर्ण करावा.
२) सभेत स्वयंशिस्त पाळावी, हुल्लडबाजी करू नये.
३) पोलिसांनी दिलेल्या मार्गावरूनच प्रवास करावा.
४) कार्यक्रमादरम्यान शस्त्र आणू नये.
५) येणाऱ्या लोकांची अंदाजे संख्या एक दिवस अगोदर सांगावी.
६) सभास्थानी आसनव्यवस्था १५ हजार असल्यामुळे जास्त लोकांना बोलावू नये.
७) सभेत वंश, जात, भाषा, वर्ण, प्रदेश, जन्मस्थान, धर्म इ.विषयी वादग्रस्त बोलू नये.
८) ५५ डेसिबलपेक्षा अधिक आवाज जाऊ नये.
९) सभेसाठी महिला व पुरुषांची स्वतंत्र आसनव्यवस्था असावी. पिण्याचे पाणी व स्वतंत्र स्वच्छतागृहाची व्यवस्था करावी.
१०) कार्यक्रमात मिठाईसह अन्नपदार्थांचे वाटप होत असल्यास विषबाधा होणार नाही, याची दक्षता घ्यावी.

प्रत्यक्ष परिस्थिती
१) कार्यक्रम नियोजित वेळेत पूर्ण झाला.
२) सभेत मोठ्या प्रमाणात खुर्च्यांची फेकाफेकी, हुल्लडबाजीही झाली.
३) पोलिसांनी सांगितलेल्या मार्गावरून प्रवास केला.
४) सभेत कुणाकडेही शस्त्रे, तत्सम वस्तू सापडल्या नाहीत.
५) सभेसाठी एक दिवस अंदाजे येणारे लोक सांगितले.
६) सभेला ३० ते ३५ हजार लोक जमले.
७) जात, धर्मावर प्रखर टीका. दुसऱ्या धर्मावरही टिपणी
८) आवाजाची मर्यादा ८४ डेसिबलपर्यंत पोहोचली.
९) सभेसाठी स्वतंत्र आसनव्यवस्था. स्वच्छतागृहाची वानवा.
१०) अन्नपदार्थांचे वाटप केले नाही.

गृहमंत्रालयास अहवाल 
शहर पोलीस राज ठाकरे यांच्या सभेत झालेल्या नियमांच्या उल्लंघनाचा अहवाल राज्याच्या गृह विभागाला पाठविण्यात आला. या अहवालाच्या आधारे गृह विभागाने आज दिलेल्या आदेशानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करण्यात आली. 

३० ते ३५ हजारांची गर्दी
मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या मराठवाडा सांस्कृतिक मैदानावरील सभेला ३० ते ३५ हजार लोकांची उपस्थिती असल्याचा अहवाल पोलिसांनी वरिष्ठांकडे सोपविला आहे. सभेसाठी १५ हजार खुर्च्यांची मांडणी करण्यात आली होती. खुर्च्या कमी पडल्यामुळे सभास्थळी उभारलेले पडदे काढून मैदानाच्या बाकड्यावर आलेले लोक बसले. एकूण मैदानाची क्षमता आणि त्यात लोकांना खुर्चीवर बसण्यासाठी लागणारी जागा, उभे राहिल्यानंतर किती लोक थांबू शकतात, त्यावरून पोलिसांनी ३० ते ३५ हजार लोकांची उपस्थिती असल्याचा अंदाज लावला आहे.

सभेत नियमांचे उल्लंघन, पोलिसांकडून दिवसभर छाननी
राज ठाकरे यांच्या सभेला पोलिसांनी १५ अटींचे पालन करण्याची हमी घेतल्यानंतरच परवानगी दिली होती. त्यातील बहुतांश अटीचे उल्लंघन झाल्याचा ठपका ठेवण्यात येत आहे. १५ हजारांपेक्षा अधिक गर्दी जमवायची नाही, ५५ डेसिबलपेक्षा अधिक आवाज होऊ नये, जातीय, धार्मिक विषयांवर बोलू नये, इ. बंधने घालण्यात आली होती. मात्र, ही सर्व बंधने झुगारून देण्यात आल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे ठाकरेंवर गुन्हा नोंदविण्याची मागणी होत आहे. त्यामुळे पोलीस उपायुक्त अपर्णा गीते, सायबरचे निरीक्षक गौतम पातारे, गुन्हे शाखेचे अविनाश आघाव यांच्यासह इतर अधिकारी कोणत्या नियमांचे उल्लंघन करण्यात आले, त्याविषयी दिवसभर छाननी करीत होते.

Web Title: What were the conditions of the police for the ‘Raj’sabha; How many violations actually took place? Find out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.