हिंगोलीतही पाणी अपव्यय

By Admin | Updated: April 23, 2016 23:54 IST2016-04-23T23:52:37+5:302016-04-23T23:54:57+5:30

हिंगोली : दुष्काळी स्थितीमुळे मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत इतर ठिकाणाहून पाणी आणावे लागत आहे. लातूरला तर रेल्वेने पाणीपुरवठा होत आहे.

Water wastage in Hingoli | हिंगोलीतही पाणी अपव्यय

हिंगोलीतही पाणी अपव्यय

हिंगोली : दुष्काळी स्थितीमुळे मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत इतर ठिकाणाहून पाणी आणावे लागत आहे. लातूरला तर रेल्वेने पाणीपुरवठा होत आहे. त्या पार्श्वभूमीवर हिंगोली शहरातील पाण्याच्या अपव्ययाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
हिंगोलीत चार दिवसाआड पाणीपुरवठा होतो. त्यामुळे पाण्यासाठी तेवढी ओरड नाही. नवीन जलवाहिनी टाकूनही अनेक भागात पुरेसे पाणी नाही. जुन्या वाहिनीवर पाणीपुरवठा होणाऱ्या भागात गळतीत लाखो लिटर पाणी वाया जात आहे. आदर्श महाविद्यालय परिसरात नेहमी या समस्येला सामोरे जावे लागत आहे. अकोला रोडवर दोन-तीन ठिकाणी गळती होत आहे. नारायणनगर परिसरातही अधूनमधून असे चित्र पहायला मिळते. सिद्धार्थनगरातही असाच प्रकार घडत आहे. एवढेच काय तर हिंगोलीला सिद्धेश्वरहून येणाऱ्या वाहिनीचे व्हॉल्व्हही ठिकठिकाणी गळत आहेत. त्यावर अनेकजण पाणी भरताना दिसतात. त्यामुळे नगरपालिकेने या सर्व प्रकाराकडे लक्ष देणे गरजेचे बनले आहे.
शहराच्या नजीकच्या भागात एकीकडे पाण्यासाठी नागरिकांची भटकंती सुरू असताना दुसरीकडे शहरात मात्र अशाप्रकारे पाणी वाया जात आहे. नजीकच्या खेड्यांतही पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. अंधारवाडी, बळसोंडमध्ये गंभीर चित्र आहे. कारवाडी, सुराणानगर आदी भागांना टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे.
हिंगोलीकरांना सध्यातरी ही वेळ आली नसली तरीही पाणी वापराबाबत सजग राहावे लागणार आहे. नळांना तोट्या बसविणेही तेवढेच गरजेचे आहे. सिद्धेश्वरचे पाणीही जोत्याखाली गेल्यातच जमा आहे. येलदरी तर अगोदरच जोत्याखाली गेलेले आहे.

Web Title: Water wastage in Hingoli