प्रयोगशाळेत ४ वर्षांपासून पाणीटंचाई

By Admin | Updated: June 2, 2014 01:34 IST2014-06-02T01:25:28+5:302014-06-02T01:34:17+5:30

औरंगाबाद : औरंगाबादसह जिल्ह्यातील विविध तालुके आणि गावांतील पिण्याच्या पाण्याची तपासणी करणार्‍या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रादेशिक प्रयोगशाळा चार वर्षांपासून पाणीटंचाईला तोंड देत आहेत.

Water shortage for 4 years in the laboratory | प्रयोगशाळेत ४ वर्षांपासून पाणीटंचाई

प्रयोगशाळेत ४ वर्षांपासून पाणीटंचाई

औरंगाबाद : औरंगाबादसह जिल्ह्यातील विविध तालुके आणि गावांतील पिण्याच्या पाण्याची तपासणी करणार्‍या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रादेशिक प्रयोगशाळा चार वर्षांपासून पाणीटंचाईला तोंड देत आहेत. या प्रयोगशाळेने नळजोडणी मिळण्यासाठी छावणी परिषदेकडे पाठपुरावा केला; परंतु अधिकारी दाद देत नसल्याचे समोर आले आहे. आजही प्रयोगशाळेतील अधिकारी कार्यालयात येताना घरूनच पाण्याच्या बाटल्या आणतात. प्रादेशिक प्रयोगशाळा नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेते. दूषित पाण्यामुळे साथरोग पसरू नये, यासाठी पिण्याच्या पाण्याची नियमित तपासणी करून त्याचा अहवाल देत असते. त्यामुळे साथरोगावर नियंत्रण ठेवणे अधिकार्‍यांना शक्य होते. अशा या महत्त्वाच्या कार्यालयातील पिण्याच्या पाणी प्रश्नाकडे मात्र दुर्लक्ष झाले आहे. चार वर्षांपूर्वी प्रयोगशाळेच्या नळाची पाईपलाईन लष्कराने केलेल्या खोदकामामुळे फुटली व पाणीपुरवठा बंद पडला. प्रयोगशाळेचे तत्कालीन प्रभारी अधिकारी सूर्यवंशी यांनी छावणी परिषदेच्या सीईओंना भेटून तुटलेली पाईपलाईन जोडून देण्याची विनंती केली. मात्र, लष्कराच्या अधिकार्‍यांनी त्या ठिकाणाहून नळजोडणी देण्यास नकार दिला. दरम्यान, सूर्यवंशी गेल्यावर्षी निवृत्त झाले. त्यांच्यानंतर मुख्य अनुजीवशास्त्रज्ञ एस.व्ही. पत्की प्रभारी अधिकारी म्हणून आले. त्यांनीही नळजोडणीसाठी छावणी परिषदेच्या अधिकार्‍यांना पत्र दिले. मुख्य जलवाहिनी ते प्रयोगशाळेदरम्यान पाईपलाईन टाकावी लागणार आहे. त्यासाठी पाहणी करून अंदाजपत्रक तयार करून देण्याची विनंती त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांना केली. सार्वजनिक बांधकाम विभागाकडूनही अंदाजपत्रक देण्यास टाळाटाळ होत असल्याचे पत्की यांनी सांगितले. घरून आणावे लागते पाणी प्रयोगशाळेत चार वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची सोय नाही. त्यामुळे अधिकारी, कर्मचारी कामाला येताना घरूनच पाण्याची बाटली आणतात. शहराबाहेर असलेल्या या प्रयोगशाळेत पाणी नमुने तपासणीसाठी घेऊन जाणार्‍या व्यक्तीलाही अधिकारी आपल्याकडील बाटलीतील पाणी पिण्यास देतात.

Web Title: Water shortage for 4 years in the laboratory