नाचनवेल : पिशोर येथील अंजना-पळशी धरणाच्या लोकार्पणाला वीस वर्षांहून अधिक काळ लोटल्यानंतर लाभक्षेत्रातील गावे आजही तहानलेलीच आहेत. यंदा कडक उन्हाळ्याची चाहूल लक्षात घेता या लाभक्षेत्रातील गावांसाठी पाणी सोडण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
अंजना नदीवर पिशोर येथे बांधण्यात आलेल्या या धरणाखालील सुमारे १५ किमीपर्यंतचा परिसर हा जलसिंचन क्षेत्र (कमांडिंग एरिया) म्हणून गणला जातो. यामुळे जमीन खरेदी-विक्री व्यवहारात अधिकचे मुद्रांक शुल्क आकारले जाते. पिशोर धरणाच्या डाव्या कालव्यावर नादरपूर, मोहाडी, आमदाबाद, नाचनवेल व आडगाव शिवारातील शेतीक्षेत्र आहे. धरणाच्या निर्मितीपासून या कालव्यात केवळ एक ते दोन वेळा आवर्तने सोडण्यात आली. आजघडीला कालव्यात अनेक ठिकाणी झाडे वाढली असून, कालव्यावरील पूल मोडकळीस आले आहेत. धरण लाभक्षेत्रात असल्याने या गावांचा समावेश पोखरा योजनेत झालेला नाही व शेतकऱ्यांना ठिबक, तुषार सिंचनासाठी असलेल्या वाढीव अनुदानापासूनही वंचित राहावे लागत आहे. येत्या उन्हाळ्यात टँकरवर खर्च करण्यापेक्षा अंजना पळशी प्रकल्पातून तत्काळ पाण्याचे आवर्तन सोडून संभाव्य पाणीटंचाईला प्रतिबंध करण्याची मागणी सर्व ग्रामपंचायतींनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली आहे.
उजवा कालवा मोहऱ्यापर्यंत वाढविण्याची मागणी
उजव्या कालव्याच्या लाभक्षेत्रात भिलदरी, शफियाबाद, नादरपूर, पिंपरखेड, जवखेडा बु., जवखेडा खु., सारोळा, आमदाबाद, नाचनवेल, कोपरवेल, मोहरा व टाकळी इ. गावे समाविष्ट आहेत. परंतु या कालव्याचे पुढे कामच झालेले नाही. लवकरात लवकर सर्वेक्षण व जमीन संपादनाची प्रक्रिया पूर्ण करून कालवा मोहऱ्यापर्यंत वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.
कोट
वीस-पंचवीस वर्षांपूर्वी नाचनवेल परिसर हा उसाचा पट्टा म्हणून ओळखला जात होता. परंतु पिशोर धरणाच्या उभारणीनंतर मात्र धरणाखाली नदीपात्रातील पाण्याची आवक घटत जाऊन कोरडवाहू पिकांवर विसंबून राहण्याची वेळ आली आहे. धरण उशाशी असूनही ही गावे पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून असतात. या भागाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी शासनदरबारी निवेदने दिली आहेत.
-विठ्ठलराव थोरात, माजी बांधकाम सभापती (जि.प. औरंगाबाद)
फोटो कॅप्शन - अंजना-पळशी धरणात सध्या मुबलक जलसाठा असून, तांत्रिक बाबींची पूर्तता करून विसर्ग करण्याची मागणी होत आहे.
050421\20210405_104841_1.jpg
अंजना-पळशी धरणात सध्या मुबलक जलसाठा असून तांत्रिक बाबींची पूर्तता करून विसर्ग करण्याची मागणी होत आहे.