मराठवाड्यात अवकाळी पावसाचा कहर; लातूर, धाराशिवमध्ये १२ महसूल मंडळांत अतिवृष्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2025 13:56 IST2025-05-24T13:56:15+5:302025-05-24T13:56:29+5:30

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात भिंत कोसळून एका मुलीचा मृत्यू; १० जण जखमी

Unseasonal rains wreak havoc in Marathwada; Heavy rains in 12 revenue circles in Latur, Dharashiv | मराठवाड्यात अवकाळी पावसाचा कहर; लातूर, धाराशिवमध्ये १२ महसूल मंडळांत अतिवृष्टी

मराठवाड्यात अवकाळी पावसाचा कहर; लातूर, धाराशिवमध्ये १२ महसूल मंडळांत अतिवृष्टी

छत्रपती संभाजीनगर : भर उन्हाळ्यात मराठवाड्यात पावसाळ्याची अनुभूती येत आहे. आठ दिवसांपासून अवकाळी पावसाने कहर केला असून फळबागा, पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. धाराशिवमध्ये सात, तर लातूर जिल्ह्यातील पाच महसूल मंडळांत अतिवृष्टी झाली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अंजना, भोरडी, गिरिजा नदीला पूर आला असून, वादळी वाऱ्याने अनेक घरांवरील पत्रे उडून गेले आहेत.

मे महिन्यातच धाराशिव जिल्ह्यात अवकाळी पावसाने तडाखा दिला आहे. पर्जन्यमापकावर झालेल्या नाेंदीनुसार गुरुवारी दुपारी बारा वाजेपर्यंत तब्बल सात मंडळांमध्ये अतिवृष्टीची नाेंद झाली.

लातूर शहरासह औसा, निलंगा तालुक्यांत बुधवारी रात्री मुसळधार अवकाळी पाऊस झाला. जिल्ह्यातील पाच महसूल मंडळांत अतिवृष्टी झाली. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी ३८.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

परभणी जिल्ह्यात बुधवारी सायंकाळपासून ते गुरुवारी सकाळपर्यंत २२ मंडळांमध्ये ३० मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला. हिंगोलीतही वादळी पावसामुळे पिकांसह महावितरणचेही खांब पडल्याने नुकसान झाले.
आठवडाभरापासून नांदेड जिल्ह्यात खरीप हंगामाची पूर्वतयारी करण्याची वेळ असताना मान्सूनपूर्व पावसाने जिल्ह्यात दाणादाण उडवली आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात भिंत कोसळून एका मुलीचा मृत्यू; १० जण जखमी
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेला अवकाळी पाऊस आता जीवावर उठला असून, बुधवारी मध्यरात्री वादळी वाऱ्यासह झालेल्या या पावसामुळे घराची भिंत पडून कन्नड येथे एका १२ वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झाला. तर ७ जण जखमी झाले. पैठण तालुक्यातील ढोरकीन येथे घराची भिंत कोसळून ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. फुलंब्री तालुक्यात ११ घरांची पडझड झाली.

Web Title: Unseasonal rains wreak havoc in Marathwada; Heavy rains in 12 revenue circles in Latur, Dharashiv

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.