सिडको चौक ते हर्सूल टी पॉइंट रोडच्या काँक्रीटीकरणाचा वेग कासवालाही लाजवेल असा !

By सुमित डोळे | Updated: July 29, 2025 19:46 IST2025-07-29T19:44:44+5:302025-07-29T19:46:14+5:30

गती वाढवण्यासाठी पोलिसांकडून तीनदा पत्र, पण ठेकेदाराला मुदतीचा विसर

The speed of concreting the VIP Road from CIDCO Chowk to Harsul T Point would put even a turtle to shame! | सिडको चौक ते हर्सूल टी पॉइंट रोडच्या काँक्रीटीकरणाचा वेग कासवालाही लाजवेल असा !

सिडको चौक ते हर्सूल टी पॉइंट रोडच्या काँक्रीटीकरणाचा वेग कासवालाही लाजवेल असा !

छत्रपती संभाजीनगर : ऑक्टोबर, २०२४ मध्ये मंत्री, खासदारांच्या उपस्थितीत भूमिपूजन झालेल्या सिडको चौक ते हर्सूल टी पॉइंट या व्हीआयपी रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाचा वेग मंदावला आहे. आठ टप्प्यांपैकी पिरॅमिड चौक ते आंबेडकर चौकाचे काम ४६ दिवसांत होणे अपेक्षित होते. मात्र, प्रत्यक्षात सहा महिने उलटूनही २.१ किलोमीटरच्याच अंतरात काम ठप्प आहे. याबाबत पोलिसांनी तीन वेळा राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ, मापारी इन्फ्राप्रोजेक्ट्सला पत्राद्वारे कामाची गती वाढवून खड्डे बुजवण्याची सूचना केली. मात्र, त्यानंतरही ठेकेदाराच्या कामात कुठलाही बदल झाला नसल्याने रोज हजारो नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

६६ कोटी ४६ लाख रुपयांचा खर्च नियोजित आहे. फेब्रुवारीत कामाला प्रारंभ झाला. १४ फेब्रुवारीपासून पोलिसांनी सर्व वाहतूक सर्व्हिस रोडवर वळवली. यामुळे सर्व्हिस रोडवरच वाहनांचा भार पडत आहे. ठेकेदाराच्या संथ गतीमुळे पोलिसांनाही वाहतूक नियोजन करणे आव्हान बनले आहे. आधी देवगिरी बँक ते आंबेडकर चौक रस्ता बंद करण्यात आला. आता पिरॅमिड चौकापासून बंद करण्यात आला. सहा महिने उलटूनही हा रस्ता संथ गतीमुळे बंदच आहे. यात वोक्हार्ट चौकाजवळील काम आठ दिवसांत करण्याचे आश्वासन पोलिसांना देण्यात आले. मात्र, ते काम झाले नाही.

असे काम होणे होते अपेक्षित
-वोक्हार्ट कंपनी चौक ते एन-७ येथील रिलायन्स पेट्रोल पंपापर्यंत काँक्रीटीकरण सुरू झाले. यादरम्यान सिडको बसस्थानक ते हर्सूलच्या दिशेने जाणारी वाहने याच दिशेच्या सर्व्हिस रोडने आंबेडकर चौकापर्यंत वळवण्यात आली.
-वाहतूक पोलिसांच्या सूचनेनंतर साधारण ८ टप्प्यांमध्ये काम ठरवण्यात आले. सुरुवातीला सिडको ते हर्सूल या बाजूचे संपूर्ण काम करण्याची सूचना आहे.

काय आहेत कंपनीची आश्वासने ?
-सिडको ते हर्सूल दरम्यानचे ४.९ किमी रस्त्याच्या ९ मीटरच्या काँक्रीटीकरणाच्या उजवी बाजू ८ टप्पे १० महिने २० दिवसांचा कालावधी. म्हणजेच दोन्ही बाजूंसाठी ३२० दिवसांचा कालावधी.
-याच भागाच्या १.५ रुंदीकरण व गटर १ मी बांधकामासाठी ८० दिवस. या कामानंतर उजव्या व डाव्या बाजूस ९ मीटरचे काँक्रीटीकरण सुरू करणार.

जीवितहानी झाल्यास तुम्ही जबाबदार
वाहतूक पोलिसांनी राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ व मापारी कन्स्ट्रक्शनला तीन वेळा पत्र पाठवले. कामाचा वेग वाढवावा. हर्सूल ते सिडको चौक मार्गावर खोल खड्डे पडले असून त्यात पावसाचे पाणी साचून अपघात होत आहेत. डागडुजी करावी, अन्यथा जीवितहानीला संबंधित विभाग जबाबदार असेल, असे खरमरीत पत्र पाठवले. त्यालादेखील संबंधितांनी प्रतिसाद दिला नाही.

Web Title: The speed of concreting the VIP Road from CIDCO Chowk to Harsul T Point would put even a turtle to shame!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.