गुन्हेगारांचा निर्दयीपणा, शंभर रुपयांसाठी जोरजोरात हसत मित्राच्याच हत्येचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 12:00 IST2025-05-15T11:54:38+5:302025-05-15T12:00:02+5:30
मुकुंदवाडी, पुंडलिकनगरमध्ये गुन्हेगारांचा पुन्हा राडा : खुनाच्या प्रयत्नाच्या दोन घटना

गुन्हेगारांचा निर्दयीपणा, शंभर रुपयांसाठी जोरजोरात हसत मित्राच्याच हत्येचा प्रयत्न
छत्रपती संभाजीनगर : मुकुंदवाडी, पुंडलिकनगरमधील गुन्हेगारांच्या टोळीची दहशत, निर्दयीपणा पुन्हा एकदा समोर आला आहे. दारू पिण्यासाठी शंभर रुपये न दिल्याच्या रागातून गुन्हेगारांनी मित्राच्याच पोटात चाकूने सपासप वार करून जोरजोरात हसत खुनाचा प्रयत्न केला. रविवारी मध्यरात्री विश्रांतीनगरमध्ये घडलेल्या घटनेत गजानन पांडुरंग खालापुरे (२५, रा. आनंदनगर) हा गंभीर जखमी झाला.
रोहित घुले, चिंग्या ऊर्फ संदेश खडके, सचिन देविदास भवाळ, शेख अल्ताफ शेख मुबारक अशी आरोपींची नावे आहेत. ११ मे रोजी रात्री ११:४५ वाजता गजानन मुकुंदवाडी रेल्वे स्थानकावरून घरी जात होता. आरोपींनी विश्रांतीनगरजवळ त्याला थांबवत दारूसाठी १०० रुपयांची मागणी केली. गजाननने पैसे देण्यास नकार दिला. तेवढ्यात अल्ताफने त्याचे हात पकडताच राेहितने थेट धारदार चाकूने त्याच्या पोटात वार केले. चिंग्याने डोक्याचे केस पकडून पाठीत चाकूने सपासप वार केले. गजानन रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असताना आरोपी जोरजोरात हसत त्याच्या जखमांवर पायाने मारत आरडाओरड करत होते. हा धिंगाणा ऐकून स्थानिकांनी धाव घेताच आरोपींनी पळ काढला. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर गजाननच्या जबाबावरून मंगळवारी पुंडलिकनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सर्व आरोपी रेकॉर्डवरचे गुन्हेगार असून, त्यांचा शोध सुरू असल्याचे निरीक्षक कृष्णा शिंदे यांनी सांगितले.
मारहाण केल्याचा राग, तरुणावर जीवघेणा हल्ला
दुसऱ्या घटनेत मारहाणीच्या आरोपातून रोहित शाहाराव (२१, रा. गणेशनगर) याच्यावर तीन गावगुंडांनी जीवघेणा हल्ला करत हत्येचा प्रयत्न केला. ११ मे रोजी रात्री १२ वाजता रोहितच्या घरासमोर कृष्णा ऊर्फ कल्ल्या माणिक साळुंके, अमन पटेल व एजाज ऊर्फ इज्जू सय्यद यांचे मंडप व्यावसायिक सुनील वाघ साेबत वाद झाले होते. त्यात भांडणात रोहितने मारहाण केल्याचा आरोपातून तिघांनी त्याला काही वेळाने गणेशनगरमध्ये पकडले. पाठीत चाकूने सपासप वार करून गंभीर जखमी केले. याप्रकरणी पुंडलिकनगर पाेलिस ठाण्यात एजाज, अमनसह कृष्णावर गुन्हा दाखल करण्यात आला. यातील कल्ल्यावर यापूर्वी गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.