उसतोड मजुरांची पिकअप खड्ड्यात कोसळली; एक मजूर ठार, ९ जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2022 18:57 IST2022-05-09T18:56:32+5:302022-05-09T18:57:03+5:30
जमालवाडी तांड्याजवळील चढावर पिकअप वर न जाता सरळ मागे येऊन खोल खड्ड्यात उलटली.

उसतोड मजुरांची पिकअप खड्ड्यात कोसळली; एक मजूर ठार, ९ जखमी
खुलताबाद: ऊस तोडणीनंतर मजुरांना घेऊन जाणारी पिकअप गाडी उलटून एक मजूर ठार तर ९ जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात रविवारी रात्री २ वाजेच्या दरम्यान जमालवाडी तांड्याजवळ झाला. या प्रकरणी चालकास अटक करण्यात आली आहे.
जमालवाडी तांडा येथील २१ मजूर उसतोडणीसाठी फुलंब्री परिसरात रविवारी गेले होते. तोडणीनंतर रात्री उशिरा मजूर पिकअपमधून ( क्रमांक एमएच २० सीटी ३८२५ ) तांड्यावर परत चाले होते. यावेळी चालक फारूख अकबर पठाण ( रा. खांडीपिपंळगाव) याने पिकअपमध्ये दोन ते तीन टन चारा भरला होता. त्यावर सर्व २१ मजूर बसून प्रवास करत होते.
रात्री दोन वाजता जमालवाडी तांड्याजवळील चढावर पिकअप वर न जाता सरळ मागे येऊन खोल खड्ड्यात उलटली. यात प्रताप दिपचंद राठोड ( ५५) हा मजूर जागीच ठार झाला. तर गणेश रूपचंद राठोड, आरती गणेश राठोड, हरीचंद भावसिंग राठोड, राजू बद्दू राठोड, संतोष जोधू राठोड, सरिता संतोष राठोड, सुभाष बद्दू राठोड, वनसिंग सुकलाल राठोड, वनिता सुभाष राठोड हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर औरंगाबाद येथे उपचार सुरू आहे.
या प्रकरणी खुलताबाद पोलीसांनी पंचनामा करून आरोपी चालक फारूख अकबर पठाण यास अटक केली आहे. मयत प्रताप दिपचंद राठोड याच्या मृतदेहाचे खुलताबाद ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदन करून दुपारी जमालवाडी तांडा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.