Chitegaon Crime: ६ वर्षांपुर्वी लहान भावाचा खून केल्याचा बदला घेण्यासाठी चितेगाव येथील प्लॉटिंग व्यावसायिकाचे अपहरण करून त्याला ठार केल्याची घटना ३० जून रोजी पैठण तालुक्यात मंगळवारी घडली असून याप्रकरणी पोलिसांनी ६ जणांना अटक केली आहे. शेख अकबर शेख महेमूद ऊर्फ मियाँभाई (वय ५० , रा. चितेगाव) असे मयताचे नाव आहे.
चितेगाव येथील माजी सरपंच शेख वाहेद शेख याकुब यांचा लहान भाऊ शेख रऊफ यांचा सहा वर्षापूर्वी खून झाला होता. याप्रकरणात जिल्हा सत्र न्यायालयाने १ जानेवारी २०२५ रोजी दिलेल्या निकालात शेख अकबर यांच्यासह त्यांचे वडील, भाऊ व काका यांची निर्दोष मुक्तता केली होती. त्यावेळी वाहेद याकुब शेख यांनी मयत मयत शेख अकबर व त्यांच्या कुटुंबियांना, तुमची जरी निर्दोष सुटका झाली असली तरी मी तुम्हाला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली होती.
या पार्श्वभुमीवर कायगाव येथील शाहरुख ऊर्फ फजल सरदार शेख याने ६ महिन्यांपुर्वी मयत शेख अकबर यांच्यासोबत मैत्री केली होती. ३० जून रोजी सकाळी ११ वाजता शाहरुख ऊर्फ फजल सरदार शेख याच्या सोबत शेख अकबर हे त्यांच्या जीपने (एमएच. १२, जेझेड. ७५१२) बाहेर गेले. त्यानंतर त्यांचा त्यांच्याशी कुटुंबीयांचा संपर्क झाला नाही. मोबाइल लोकेशनने पैठण रस्त्यावरील ढोरकीन येथे असल्याचे कळाले. त्यानंतर शेख अकबर यांच्या मृतदेह पैठण येथील दादेगावजवळील पुलाखाली आढळून आला. शेख अकबर यांच्या तोंडाला जबर मारहाण झाल्याचे दिसून आले.
या प्रकरणी मयताचा मुलगा साहील अकबर शेख यांच्या फिर्यादीवरून ६ जणांविरूद्ध बिडकीन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर बिडकीन पोलिसांनी तपासचक्र फिरवून सहा आरोपींना गजाआड केले. दरम्यान, मृत शेख अकबर यांच्या दफनविधीदरम्यान चितेगाव येथे पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. या घटनेचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक नीलेश शेळके यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक महेश घुगे, पोहेकाॅ. आप्पासाहेब माळी हे करीत आहेत.
माजी सरपंचासह ६ आरोपी विविध ठिकाणी पकडलेपोलिसांनी या प्रकरणातील आरोपी शाहरुख ऊर्फ फजल सरदार शेख (रा. कायगाव, ता. गंगापूर), सोनाजी ताराचंद भुजबळ (रा. दहिफळ, ता. शेवगाव), यांना मंगळवारी रात्री कायगाव येथून तर चितेगावचा माजी सरपंच शेख वाहेद शेख याकूब, लतीफ याकूब शेख, मोबीन मुनाफ सय्यद (तिघे रा. चितेगाव, ता.पैठण) व इकबाल अहेमद जमादार (रा. एमआयडीसी, पैठण) यांना चितेगाव येथून बुधवारी सकाळी अटक केली.