-
औरंगाबाद : जिल्हा परिषद शिक्षक पतसंस्थेचे (ग्रामीण) गेल्या पाच वर्षांतील नियमबाह्य पदाधिकाऱ्यांची निवड व त्यांच्या कामाची चौकशी करून दोषी संचालक मंडळावर कारवाई करावी, या मागणीसाठी औरंगाबादच्या शिक्षक संघटना समन्वय समितीने पुण्यात गुरुवारी लक्षवेधी धरणे आंदोलन केले. राज्य सहकार सहायक आयुक्त व राज्य सहायक सहकार निवडणूक आयुक्तांनी कारवाईचे आश्वासन दिल्याचे समितीचे विजय साळकर यांनी सांगितले.
पतसंस्थेच्या इमारत कामाचे फेर मूल्यांकन सार्वजनिक बांधकाम विभागाकडून आपल्या देखरेखीखाली करण्यात यावे. बांधकामातील अनियमितता व गैरव्यवहाराबाबत दोषी संचालक मंडळावर कारवाई करावी. चौकशीला दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी. या मागण्या समितीने केल्या. सहायक आयुक्त खंडागळे यांनी आंदोलकांशी चर्चा केली. निष्पक्षपणे चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करू, असे आश्वासन त्यांनी दिले. बाबूराव गाडेकर, विजय साळकर, दिलीप ढाकणे, जयाजी भोसले, मनोज चव्हाण, श्रीराम बोचरे, कैलास व्यवहारे, गोपाल सोनार, दर्शन पाराशर, बाजीराव ताठे, राजेंद्र वाघमारे, शिवाजी दांडगे आदींचा आंदोलनात समावेश होता.