पोखर्णी होणार स्मार्ट व्हिलेज

By Admin | Updated: April 23, 2016 23:56 IST2016-04-23T23:47:03+5:302016-04-23T23:56:32+5:30

श्रीनिवास भोसले, नांदेड नांदेड तालुक्यातील पोखर्णी हे ५८८ लोकसंख्या असलेले छोटेसे गाव स्मार्ट व्हिलेजकडे वाटचाल करू पाहत आहे़

Smart Villages to be fashionable | पोखर्णी होणार स्मार्ट व्हिलेज

पोखर्णी होणार स्मार्ट व्हिलेज

श्रीनिवास भोसले, नांदेड
नांदेड तालुक्यातील पोखर्णी हे ५८८ लोकसंख्या असलेले छोटेसे गाव स्मार्ट व्हिलेजकडे वाटचाल करू पाहत आहे़ गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थांसह शिक्षकांनी पुढाकार घेतला असून या कार्याची सुरूवात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेपासून केली आहे़ शाळेतील वर्गखोल्या डिजिटल करण्याकरिता १०३ उंबरठ्याच्या गावात लोकवर्गणाीतून ८३ हजार रूपये वर्गणी जमा झाली आहे़ तर केंद्रातील शिक्षकमित्रांनी ६८ हजारांचा निधी दिला आहे़
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील बहुतांश जिल्हा परिषद शाळांचा चेहरामोहरा बदलत असून गुणवत्तेतदेखील दिवसेंदिवस वाढ होत आहे़ डिजिटल वर्ग बनविण्याकरिता ठिकठिकाणी पुढाकार घेतला जात आहे़ जिल्हा परिषद शाळांमध्ये राबविल्या जात असलेल्या विविध शैक्षणिक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये शाळेत पूर्णवेळ उपस्थित राहण्याची गोडी निर्माण होत आहे़
नांदेड तालुक्यातील पोखर्णीच्या सरपंच जयश्री शिंदे आणि ग्रामस्थांनी गावात राष्ट्रपुरूषांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण करून गाव स्मार्ट व्हिलेज बनविण्याकडे वाटचाल सुरू केली आहे़ शाळेच्या विकासाला प्राधान्य देत सरंपच शिंदे यांनी मुख्याध्यापक विनायक बारहाते यांच्या पुढाकारातून संपूर्ण शाळा डिजिटल करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत़ या कार्यात गावकऱ्यांनीदेखील हिरीरिने सहभाग नोंदवत दुष्काळीस्थितीतही ८३ हजार रूपये लोकवर्गणी गोळा करून दिली़
पोखर्णी जि़प़शाळेत पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळेत ४३ विद्यार्थी शिक्षण घेतात़ येथील डिजिटल वर्ग खोलीचे काम अंतिम टप्प्यात आहे़ तत्पूर्वी मुख्याध्यापक बारहाते यांनी टॅब आणि लॅपटॉपचा वापर करीत विद्यार्थ्यांमध्ये संगणक आणि स्मार्ट एज्युकेशनची आवड निर्माण केली आहे़ शैक्षणिक साहित्याचा वापर करीत विद्यार्थी शिक्षणाचे धडे गिरवत आहेत़ सदरील साहित्य ठेवण्याकरिता ग्रामपंचायत सदस्यांनी अभिव्यक्ती फलक शाळेला भेट दिला आहे़
शाळेच्या भिंतीवरील चित्रातून शिक्षण, पुस्तक, वाचन आदीचे महत्व स्पष्ट होते़ चारोळ्या, संदेश आणि बोलक्या चित्रांनी शाळेच्या भिंती रंगल्याने शाळेचा परिसर प्रसन्न वाटतो़ यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची गोडी निर्माण होते़

 

Web Title: Smart Villages to be fashionable