कापसाच्या थप्पीने त्वचेचे आजार; कमी भावात तरी कसा विकणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 11:50 IST2025-01-27T11:45:40+5:302025-01-27T11:50:01+5:30
लग्नसराई सुरू झाल्याने शेतकऱ्यांना खर्चासाठी कापूस विक्री करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.

कापसाच्या थप्पीने त्वचेचे आजार; कमी भावात तरी कसा विकणार?
छत्रपती संभाजीनगर : गतवर्षीप्रमाणे आताही कापसाचे दर वाढले नाहीत. कापसाच्या दरवाढीची आशा मावळल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. भाववाढीच्या अपेक्षेने मागील चार महिन्यांपासून घरात कोंबून ठेवलेल्या कापसातील पिसवा, अळी आणि अन्य कीटकांमुळे शेतकऱ्यांना विविध त्रासांना सामोरे जावे लागत आहे. काही शेतकऱ्यांच्या अंगावर पुरळ येत आहे तर काहींच्या संपूर्ण शरीराला खाज येते.
दोन रूमचे घर; एक खोली कापसाने पॅक
ग्रामीण भागातील प्रत्येक गावात असे अनेक शेतकरी आहेत ज्यांच्याकडे केवळ दोन रूमचे घर असते. यातील एका खोलीत ते कापूस ठेवतात तर दुसऱ्या खोलीत संसारोपयोगी साहित्य ठेवतात. कापसाने पॅक झालेल्या खोलीत शेतकऱ्यांना झोपावे लागते.
उंदीर अन् विस्तवाचा धोका
घरात कोंबून ठेवलेल्या कापसाला आग आणि उंदरांचा धोका असतो. यामुळे या दोन्हींपासून कापसाचे संरक्षण करताना शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते.
भाव ७ हजारांच्या पुढे सरकला नाही
जिल्ह्यात दरवर्षी खरीप हंगामातील कापसाचे क्षेत्र ७५ टक्क्यांवर असते. गतवर्षी ७ हजार रुपये प्रति क्विंटलपेक्षा अधिक दर कापसाला मिळाला नाही. यंदाही कापसाचा दर ७ हजारांच्या पुढे सरकलाच नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
अंगाला खाज; बालके हैराण
कापसाच्या थप्पीवर प्राण्याच्या अंगावर असतात तशा पिसवा, अन्य बारीक किडे असतात. हे किडे शेतकऱ्यांना आणि त्यांच्या मुलांना चावतात. यामुळे अंगाला खाज येणे, पुरळ येण्याचा प्रकार होतो.
कापसाने संक्रांत आणली
कापसाचा सिझन सुरू झाला तेव्हापासून कापसाचा दर ७ हजारांपर्यंतच आहे. संक्रांतीनंतर कापसाचे दर वाढतील, या आशेपोटी मागील चार महिन्यांपासून शेतकऱ्यांनी घरात कापूस कोंबून ठेवला होता. मात्र, कापसावरच संक्रांत आल्याचे दिसून येते.
लग्नसराईने चणचण, आता विकावाच लागणार
लग्नसराई सुरू झाल्याने शेतकऱ्यांना खर्चासाठी कापूस विक्री करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. शिवाय कापसाचा दर वाढत नसल्याने गतवर्षी वर्षभर कापूस सांभाळून काही लाभ झाला नव्हता. यामुळे शेतकऱ्यांनी आता कापसाची विक्री करण्यास सुरुवात केली आहे.
कापूस विकण्याचा निर्णय
कापसाचे दर वाढतील या आशेपोटी आम्ही घरात कापूस कोंबून ठेवला आहे. आता या कापसातील किडे रोज चावतात. यामुळे कापूस विकण्याचा निर्णय घेतला.
- रामदास पाटील, शेतकरी
सध्या तरी ७ हजारांपर्यंतच दर
सीसीआयचा दर ७ हजारपर्यंतच आहे. शिवाय खासगी जिनिंगवर कापूस याच दराने खरेदी केला जातो. यामुळे आम्ही शेतकऱ्यांकडून ६८०० ते ७००० रुपये क्विंटल दराने कापूस खरेदी करतो.
- लक्ष्मणराव जाधव, व्यापारी