सिल्लोड तालुक्यात ९० टक्के पेरण्या पूर्ण

By Admin | Updated: July 28, 2014 01:04 IST2014-07-28T00:42:01+5:302014-07-28T01:04:33+5:30

राजू वैष्णव, सिल्लोड सिल्लोड तालुक्यात दीड महिना उशिरा पावसाचे आगमन झाल्याने कपाशीचे क्षेत्र कमी होऊन मका, बाजरी, सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ झाली.

Sillod taluka has completed 90% sown | सिल्लोड तालुक्यात ९० टक्के पेरण्या पूर्ण

सिल्लोड तालुक्यात ९० टक्के पेरण्या पूर्ण

राजू वैष्णव, सिल्लोड
सिल्लोड तालुक्यात दीड महिना उशिरा पावसाचे आगमन झाल्याने कपाशीचे क्षेत्र कमी होऊन मका, बाजरी, सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ झाली. तालुक्यात ९० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या असून, दमदार पाऊस झाला नसल्याने जलसाठे कोरडेच आहे. शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे.
गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा दीड महिना उशिरा पेरण्या झाल्या. यंदा तालुक्यात तीन टप्प्यांत पेरणी झाली. निल्लोड, कायगाव, पिंपळगाव पेठ,भवन, बोरगाव कासारी या परिसरात जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणी केली. यानंतर घाटनांद्रा, गोळेगाव, उंडणगाव, आमठाणा, अजिंठा, शिवना या परिसरात पाऊस झाला. अंधारी, भराडी, बोरगाव बाजार, पळशी, वांगी, मोढा या परिसरात जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात पाऊस झाला. अनेक शेतकऱ्यांनी यंदा धुळपेरणी के ली होती. मध्यम व हलक्या स्वरूपाच्या पावसावर बहुतांश शेतकऱ्यांनी कपाशी, मका, सोयाबीन आदी पिकांची पेरणी केली. यानंतर दोन-तीन दिवस पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. तीन-चार दिवसांपूर्वी तालुक्यात सलग दोन दिवस रिमझिम पाऊस झाल्याने जमिनीत खोलवर ओल गेल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. तालुक्यात ९७ हजार हेक्टर जमीन आहे. यापैकी ९१ हजार हेक्टर क्षेत्रात पेरण्या पूर्ण झालेल्या आहेत.
कपाशी, मकाच्या उत्पन्नात सिल्लोड तालुका जिल्ह्यात अग्रेसर आहे. परंतु यंदा दीड महिना पावसाचे उशिरा आगमन झाल्याने कपाशीचे क्षेत्र कमी होऊन मका, बाजरी, सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. तालुक्यात कपाशी, मका ही दोन पिके प्रामुख्याने घेतली जातात; परंतु यंदा अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केली. तालुक्यातील शेतकरी सोयाबीन पिकाकडे आकर्षित होत आहे.
पूर्वहंगामी कपाशीची लागवड
गेल्यावर्षी तालुक्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने नदी, नाले, खळखळून वाहत होते. यामुळे बहुतांश जलसाठे ओव्हरफ्लो झाले होते. मार्च महिन्यात तालुक्यात मोठ्या प्रमाणात गारपिटीसह पाऊस झाल्याने विहिरींना मुबलक प्रमाणात पाणी होते. यामुळे यंदा शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पूर्वहंगामी कपाशीची लागवड केली. तालुक्यात ८ हजार हेक्टर जमिनीत शेतकऱ्यांनी पूर्वहंगामी कपाशीची लागवड केलेली आहे.
२२ गावांना टँकरने पाणीपुरवठा
तालुक्यात दीड महिना उशिरा पावसाचे आगमन होऊनही अद्यापपर्यंत दमदार पाऊस झाला नसल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. तालुक्यातील अंधारी, पळशी, पिंपळदरी वाडा, पिंपळदरी, अनाड, मुखपाट, गेवराई सेमी, दीडगाव, पिंप्री,जळकी घाट, केऱ्हाळा, डोंगरगाव, वडाळा, वरुड, पिरोळा-डोईफोडा, धावडा, रेलगाव वाडी, बोरगाव सारवणी, धानोरा, डकला या गावांना ३३ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी दमदार पावसाची गरज आहे.

Web Title: Sillod taluka has completed 90% sown