सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयात तीन वाघांच्या मोबदल्यात कर्नाटकातून येणार सिंह, अस्वल, कोल्हा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 16:05 IST2025-03-06T16:05:08+5:302025-03-06T16:05:36+5:30
प्राणिसंग्रहालयाला दरवर्षी लाखोंच्या संख्येने पर्यटक भेट देतात.

सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयात तीन वाघांच्या मोबदल्यात कर्नाटकातून येणार सिंह, अस्वल, कोल्हा!
छत्रपती संभाजीनगर : सिद्धार्थ उद्यानाच्या प्राणिसंग्रहालयात वाघांची संख्या बरीच आहे. तीन वाघ देऊन महापालिका सिंह, अस्वल आणि कोल्ह्याची नरमादी घेणार आहे. कर्नाटक राज्यातील शिवमोगा प्राणिसंग्रहालयाला वाघ देऊन त्यांच्याकडील तीन वेगवेगळ्या प्राजीतींचे प्राणी घेण्यात येतील.
सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयात २५० पेक्षा अधिक प्राणी आहेत. प्राणिसंग्रहालयाला दरवर्षी लाखोंच्या संख्येने पर्यटक भेट देतात. प्राणिसंग्रहालयाचे मुख्य आकर्षण म्हणजे वाघ आहेत. येथील प्रजनन दरही इतर प्राणीसंग्रहालयाच्या तुलनेत सर्वाधिक आहे. प्राणिसंग्रहालयात सिंह नसल्याने बच्चे कंपनीचा हिरमोड होतो. प्राणिसंग्रहालयात ७ पिवळ्या पट्ट्याचे वाघ आणि ५ पांढऱ्या पट्ट्याचे वाघ आहेत. कर्नाटकातील शिवमोगा प्राणिसंग्रहालयाने मनपाच्या प्राणिसंग्रहालयाशी संपर्क साधून तीन वाघ देण्याची मागणी केली. मोबदल्यात सिंह, अस्वल, कोल्ह्याची जोडी देण्याची तयारी दर्शविली.
अदलाबदलीस हवी मान्यता
मनपाच्या प्राणिसंग्रहालयाने केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाकडे प्राण्यांची अदलाबदल करण्यास मान्यता मिळावी, म्हणून प्रस्ताव पाठविला आहे. शिवमोगा प्राणिसंग्रहालयाकडून अद्याप प्रस्ताव पाठविण्यात आलेला नाही. त्यांच्याकडून प्रस्ताव जाताच केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाकडून मंजुरी मिळाल्यानंतर प्राण्यांची अदलाबदली केली जाणार असल्याचे उपायुक्त विजय पाटील यांनी सांगितले.
मिटमिट्यात सफारी पार्क
मिटमिटा येथे महापालिकेचे भव्य प्राणिसंग्रहालय उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. दीडशे एकर जागेत हे प्राणिसंग्रहालय स्मार्ट सिटीच्या माध्यमाने तब्बल २४० कोटी रुपये खर्च करून उभारण्यात येत आहे. भविष्यात सिद्धार्थमधील प्राण्यांचे स्थलांतर करण्याची प्रक्रिया मनपाला सुरू करावी लागणार आहे. त्यामुळे या प्राणिसंग्रहालयात नवीन प्राणी आणून त्यांना येथील वातावरणाशी जुळवून घेण्यास मदत होणार आहे.