कार्यालयीन प्रमुखांना कारणे दाखवा नोटीस

By Admin | Updated: September 21, 2014 00:25 IST2014-09-21T00:05:28+5:302014-09-21T00:25:31+5:30

उस्मानाबाद : विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतरही बहुतांश शासकीय कार्यालयातील उद्घाटन, भूमिपूजनाच्या कोनशिला उघड्याच असल्याचे ‘

Show reasons to the office heads | कार्यालयीन प्रमुखांना कारणे दाखवा नोटीस

कार्यालयीन प्रमुखांना कारणे दाखवा नोटीस


उस्मानाबाद : विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतरही बहुतांश शासकीय कार्यालयातील उद्घाटन, भूमिपूजनाच्या कोनशिला उघड्याच असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या स्टींग आॅपरेशनने उघडकीस आणले होते. याबाबतचे वृत्त छायाचित्रांसह प्रसिध्द केल्यानंतर संबधित निवडणूक उपजिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी यांनी खातेप्रमुखांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून, याबाबतचा खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी निवडणुकीशी संबंधित अधिकारी, राजकीय नेते यांची बैठक घेऊन आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी सक्त निर्देश दिले आहेत. त्याच अनुषंगाने बुधवारी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, पंचायत समिती, नगर परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, बसस्थानक आदी ठिकाणी जाऊन पाहणी करण्यात आली. यावेळी बहुतांश कार्यालयातील कोनशिला झाकल्याचे दिसून आले. मात्र, जिल्हा परिषद, प्रशासकीय इमारत, शहर पोलिस ठाणे आदी शासकीय कार्यालयांच्या इमारतीतील व परिसरातील कोनशिला उघड्याच असल्याचे दिसून आले होते. मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटनांची कोनशिला तसेच जिल्हा परिषद परिसरातील उपमुख्यमंत्री नावाची कोनशिला उघडीच असल्याचे दिसले. महावितरण कार्यालयाच्या भिंतीवरही राजकीय लोकांचे अर्धवट पोस्टर झळकत असल्याचे पाहायला मिळाले होते. याशिवाय शहर पोलिस ठाण्यात भिंतीवर नागरी हक्क संरक्षण कायद्याचे राजकीय नेत्याचे पोस्टर उघडेच दिसून आले.
याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिध्द करताच संबधित कार्यालयाच्या खाते प्रमुखांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून, याबाबत चोवीस तासात खुलासा सादर करावा अन्यथा आपल्या विरुध्द आदर्श आचार संहिता भंगाचा गुन्हा
दाखल करण्यात येईल, असे यात म्हटले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Show reasons to the office heads