शिंदेसेनेला पुन्हा एकदा सहकाऱ्याचा धक्का, नगराध्यक्षपदाच्या उमेदवारचा भाजपमध्ये प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 21:27 IST2025-11-24T21:27:14+5:302025-11-24T21:27:47+5:30
दोन दिवसांपूर्वी शिंदसेनेच्या जिल्हाप्रमुख शिल्पाराणी वाडकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

शिंदेसेनेला पुन्हा एकदा सहकाऱ्याचा धक्का, नगराध्यक्षपदाच्या उमेदवारचा भाजपमध्ये प्रवेश
बापू सोळुंके, छत्रपती संभाजीनगर: भाजप आणि शिंदेसेनेंत अंतर्गत प्रवेश देऊ नये, असे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी जाहिररित्या सांगितले आहे. असे असले तरी, स्थानिक पातळीवर भाजप शिंदेसेनेला धक्यावर धक्के देत आहे. दोन दिवसांपूर्वी शिंदसेनेच्या जिल्हाप्रमुख शिल्पाराणी वाडकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर, आज फुलंब्री नगर पंचायत शिंदेसेनेच्या अध्यक्षपदाच्या उमेदवारानेच भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
जिल्ह्यातील सहा नगर परिषद आणि एक नगर पंचायत निवडणूक जोरात सुरू आहे. आपल्याच पक्षाच्या ताब्यात नगरपरिषद राहावी, यासाठी महायुतीमध्येच अंतर्गत रस्सीखेच सुरू असल्याचे पहायला मिळत आहे. महायुतीतील पक्षांनी परस्परांविरोधात उमेदवार उभे केले आहेत. यामुळे स्थानिक पातळीवर युती भंग पावली आहे. आता निदान उमेदवारांची पळावा-पळवी होऊ नये, यासाठी तीन दिवसांपूर्वी पालकमंत्री संजय शिरसाट यांनी जिल्ह्यातील सर्व नगर परिषद आणि नगर पंचायतसाठी १३३ जणांची पक्षनिरीक्षक म्हणून नेमणूक केली.
एवढेच नव्हे तर अर्जून खोतकर यांची संपर्कप्रमुखपदी पक्षाने नेमणूक केली. पालकमंत्री हे स्वत: निवडणुकीवर लक्ष ठेवून आहेत. असे असताना शिंदेसेनेचा फुलंब्री नगरपंचायत अध्यक्ष पदाचा उमेदवार आनंदा ढोके यांनी सोमवारी भाजपमध्ये प्रवेश केला. ढोके यांच्या कुटुंबातील अन्य दोन उमेदवार निवडणूक लढवित आहेत. ऐनवेळी उमेदवारच भाजपमध्ये गेल्याने शिंदसेनेचे पक्षनिरीक्षक संपर्क प्रमुख माजी महापौर त्र्यंबक तुपे हे काय करीत होते, असा सवाल आता उपस्थित होत आहे. शिवाय ऐनवेळी पक्ष बदल करील असा उमेदवार का देण्यात आला अशी चर्चा आता सुरू झाली.