आळस देण्याचा इशारा अन् ५० हजारांची लाच घेताना आरटीओ एजंटला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2025 19:10 IST2025-05-10T19:10:18+5:302025-05-10T19:10:31+5:30

मोटार वाहन निरीक्षकांसाठी २८ वर्षे जुन्या आरटीओ एजंटकडून हप्ते वसुली ?

RTO agent Dipak Pawar arrested for taking bribe of Rs 50,000 after warning of laziness | आळस देण्याचा इशारा अन् ५० हजारांची लाच घेताना आरटीओ एजंटला अटक

आळस देण्याचा इशारा अन् ५० हजारांची लाच घेताना आरटीओ एजंटला अटक

छत्रपती संभाजीनगर : ‘पेट्रोल डिझेलची क्षमतेपेक्षा अधिक वाहतुक करण्यासाठी आरटीओचे मोटार वाहन निरीक्षक, फिरत्या पथकाला पैसे द्यावे लागतात. ते दिल्यावर कारवाई होत नाही, टेन्शन घेऊ नका' असे ठाम आश्वासन देत दहा वाहनांसाठी ५० हजारांची लाच स्वीकारणारा आरटीओ अधिकाऱ्यांचा एजंट दीपक साहेबराव पवार (४५, रा. गजानननगर, गारखेडा) याला एसीबीने अटक केली. शुक्रवारी दुपारी ३.४५ वाजता आरटीओ कार्यालयाजवळील हॉटेलमध्ये रचलेल्या सापळ्यात दीपक रंगेहाथ अडकला गेला.

४३ वर्षीय तक्रारदाराची ट्रान्सपोर्ट कंपनी असून, दहा मोठ्या गाड्यांमधून छत्रपती संभाजीनगर ते चेन्नई अशी डिझेलची वाहतूक हाेते. या वाहतुकीदरम्यान आरटीओ विभागाच्या वतीने मोटार वाहन निरीक्षक, फिरत्या पथकाकडून ओव्हरलोड वाहनांवर कारवाई टाळून जिल्ह्यातून विनाकारवाई वाहने जाऊन देण्यासाठी पवारने प्रतिवाहन पाच हजार रुपये असे एकूण ५० हजारांसाठी तगादा लावला होता. ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाने याबाबत दि. ८ मे रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक संदीप आटोळे यांच्याकडे तक्रार केली होती. आटोळे यांच्या सूचनेवरून उपअधीक्षक दिलीप साबळे यांनी तक्रारीची खातरजमा केली. तेव्हा पवार लाच मागत असल्याचे निष्पन्न झाले.

आळस देण्याचा इशारा अन् पवार अडकला
उपअधीक्षक दिलीप साबळे, निरीक्षक वाल्मीक कोरे यांनी शुक्रवारी दुपारी ३ वाजता सापळा रचला. पवारने तक्रारदाराला संपर्क करून जवळीलच एका हॉटेलमध्ये बोलावले. पवारने पैसे स्वीकारता आळस आल्याचा इशारा देण्याचे ठरले होते. पवार ने येताच ५० हजार रुपये रोख स्वीकारले आणि तक्रारदाराने आळस देताच पथकाने हॉटेलमध्ये धाव घेत पवारच्या मुसक्या आवळल्या. त्याच्या अंगझडतीतून दोन मोबाइल जप्त करण्यात आले. शिवाय, दुसऱ्या पथकाने त्याच्या घराची झाडाझडती सुरू केली.

राजकीय पार्श्वभूमी, हजारो गाड्यांची माहिती
शिंदेसेनेचा पूर्व शहर संघटक तसेच वाहतूक सेनेचा जिल्हाप्रमुख असलेला पवार गेल्या २८ वर्षांपासून आरटीओत एजंट आहे. अनेक राजकीय नेते, पोलिस अधिकाऱ्यांसोबत त्याची उठबैस आहे. लाच मागताना त्याने वारंवार आरटीओ अधिकाऱ्यांसह फिरत्या पथकांच्या लाचखोरीबाबत तक्रारदाराला माहिती दिली.

चौकशीत निष्पन्न झाल्यास कारवाई
पवारचे दोन मोबाइल जप्त केले आहे. त्यात अधिकाऱ्याचे नाव निष्पन्न झाल्यास निश्चित कारवाई होईल. प्राथमिक पुराव्यांत अधिकाऱ्याचे नाव नसून केवळ पदांचा उल्लेख आहे.
- संदीप आटोळे, अधीक्षक, एसीबी

Web Title: RTO agent Dipak Pawar arrested for taking bribe of Rs 50,000 after warning of laziness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.