२१ एप्रिलपासून लग्न सराईची पुन्हा धूम; छ. संभाजीनगरात १ हजार कोटींच्या उलाढालीचा अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 20:04 IST2026-04-16T20:03:56+5:302026-04-16T20:04:32+5:30
सिलिंडरचा तुटवडा? लग्नाच्या पंगतीसाठी बायोगॅस आणि चुलीचा पर्याय; केटरर्स आणि मंगल कार्यालयांचे 'मायक्रो प्लॅनिंग'.

२१ एप्रिलपासून लग्न सराईची पुन्हा धूम; छ. संभाजीनगरात १ हजार कोटींच्या उलाढालीचा अंदाज
छत्रपती संभाजीनगर : घोड्यावर बसलेला नवरदेव... वरातीत ‘आज मेरे यार की शादी है’ या गीतावर थिरकणारे नातेवाईक, मित्रमंडळी, मंगलाष्टकांचा आवाज आणि नंतर ‘शुभमंगल सावधान’ असे म्हणताच आतषबाजी, टाळ्यांचा कडकडाट असे दृश्य आता पुन्हा अनुभवता येईल. तब्बल ३५ दिवसांच्या खंडानंतर पुन्हा एकदा लग्नसराईच्या धामधुमीला सुरुवात होत आहे. मॅरेज इंडस्ट्री आता ‘सावधान’मध्ये काम करीत आहे. या लग्नसराईमुळे सुमारे ५० हजार लोकांना हंगामी रोजगार मिळेल.
किती तारखेपासून सुरू होतोय लग्नहंगाम?
मार्च महिन्यातील १६ तारखेला शेवटची लग्नतिथी होती. त्यानंतर ३५ दिवसांनी म्हणजे २१ एप्रिलपासून लग्नहंगामाला सुरुवात होईल.
मुख्य काळातील लग्नाच्या २८ तारखा
एप्रिल :- २१, २६, २८, २९, ३०.
मे :- १, ३, ६, ७, ८, ९, १०, १३, १४.
जून :- १९, २०, २२, २३, २४, २७.
जुलै :- १, २, ३, ४, ७, ८, ९, ११.
३ मेपर्यंतच्या लग्नाच्या पत्रिका वाटप
नवीन लग्नहंगामाला सुरुवात होत आहे. साधारणत: लग्नाच्या १५ ते २० दिवस अगोदर पत्रिका वाटप करण्यास सुरुवात होते. आता सध्या ३ मेपर्यंतच्या लग्नाच्या पत्रिका वाटप करणे सुरू आहे. जून महिन्यातील लग्नपत्रिका तयार होत आहेत. ८० टक्के पत्रिका १३ रुपये ते २५ रु.दरम्यानच्या असतात.
आदेशपालसिंग छाबडा, व्यावसायिक
‘मुंगळा’, ‘भांगडा’ या गाण्यांची प्रॅक्टिस
जालना, परभणी, नगर जिल्ह्यांतून बँड पथकाचे कलाकार हंगामी रोजगारासाठी शहरात दाखल आले आहेत. बँडपथकाच्या मालकांनी त्यांची राहण्याची व जेवणाची व्यवस्था केली आहे. यंदाच्या हंगामात नवीन गाण्यांऐवजी जुन्याच सदाबहार गाण्यांची प्रॅक्टिस कलाकार करीत आहेत. त्यात, ‘बिलनची नागीण निघाली...’, ‘मुंगळा- मुंगळा’, ‘मेरे यार की शादी है’, ‘झिंगाट’ ही गाणी वाजविल्याशिवाय वरातीचा आनंद पूर्ण होत नाही.
सय्यद आजम, मालक, ब्रास बँड पथक
सुरुची भोजन गॅससोबत ‘बायोगॅस’, ‘चुली’वरसुद्धा
आता व्यावसायिक सिलिंडर उपलब्ध होत आहेत; पण प्रमाण कमी आहे. ऐनवेळेवर फजिती नको म्हणून अनेकांनी अखेरीस गॅसला प्रभावी पर्याय म्हणून बायोगॅस आणि लाकूड किंवा कोळसा वापरून चुलीवर स्वयंपाक करण्याचे ठरविले आहे.
-विलास कोरडे,मालक, मंगल कार्यालय
२८ लग्नतिथीत करोडोंची होणार उलाढाल
लग्नसराईच्या निमित्ताने लहान-मोठ्या ५० क्षेत्रातील व्यवसायांमध्ये उलाढाल होते. शहरात १० प्रमुख इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी, ५० प्रमुख केटरर्स, दोनशे मंगल कार्यालये व दहा प्रमुख मोठी हॉटेल्स आहेत. एप्रिल ते जुलैपर्यंत २८ मुख्य लग्नतिथी आहेत. यात अंदाजे पाच हजार विवाहांतून एक हजार कोटींची उलाढाल होईल. जुलै महिन्यापर्यंतच यंदा मुहूर्त आहेत. नंतर ६ महिने नाहीत.
राहुल बोधनकर, सचिव, इव्हेंट मॅनेजर्स असोसिएशन