संपामुळे महसूल ठप्प

By Admin | Updated: August 3, 2014 01:13 IST2014-08-03T00:39:20+5:302014-08-03T01:13:38+5:30

हिंगोली : आपल्या विविध मागण्यांसाठी महसूल कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे कामकाज ठप्प झाले असून सर्वत्रच कार्यालयात शुकशुकाट दिसून येत होता.

Revenue Recovery | संपामुळे महसूल ठप्प

संपामुळे महसूल ठप्प

हिंगोली : आपल्या विविध मागण्यांसाठी महसूल कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे कामकाज ठप्प झाले असून सर्वत्रच कार्यालयात शुकशुकाट दिसून येत होता. वरिष्ठ अधिकाऱ्यांशिवाय इतर कोणीही उपस्थित दिसत नव्हते. आलेले कर्मचारीही कार्यालयाबाहेरच रेंगाळत असल्याचे चित्र दिसले.
जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय व तहसील कार्यालयात हिंगोलीमध्ये सारखेच चित्र होते. जिल्ह्यातील जवळपास २४३ कर्मचारी संपावर गेलेले आहेत. यामध्ये लिपिक, अव्वल कारकुन तसेच लिपिक संवर्गातून पदोन्नत नायब तहसीलदारांचा समावेश आहे.
संपामुळे कामकाज ठप्प असले तरी अनेकांना याबाबत माहिती नसल्याने जिल्हा कचेरीत आल्यानंतर अशांचा हिरमोड होत होता. कोणतेही काम तर होत नव्हते मात्र कामाबाबत माहिती विचारायलाही कोणी हजर नसल्याने अनेकजण त्रागा व्यक्त करून आल्या पावली परत गेले.
कळमनुरीतही यापेक्षा वेगळी स्थिती नव्हती. त्यामुळे ग्रामस्थांचे हाल झाले. (जिल्हा प्रतिनिधी)
वसमतमध्ये हेलपाटे
वसमत येथेही संपामुळे नागरिकांना नाहक हेलपाटे मारावे लागले. मात्र तहसीलदार अरविंद नरसीकर हे ठाण मांडून होते. त्यांनी मात्र जमेल तेवढ्या ग्रामस्थ व शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला.
औंढ्यात जिल्हाधिकारी
औंढा नागनाथ येथे तहसीलदार श्याम मदनूरकर व नायब तहसीलदार राजेश लांडगे हजर होते. कर्मचारी नसले तरी जिल्हाधिकारी टी.जी.कासार यांनी सायंकाळी ५ वा. येथे वनविभागाला भेट दिली.
सेनगाव, हिंगोलीतही तेच
सेनगाव व हिंगोली तहसील कार्यालयातही अशीच परिस्थिती असली तरी हिंगोलीत तहसीलदार विद्याचरण कडवकर यांनी कार्यालयीन कामे हाती घेतली होती. मात्र कर्मचारी दिसत नव्हते.
अधिकाऱ्यांचे हातावर हात
कार्यालयात कर्मचारी नसले तरी अधिकारी मात्र हजर होते. परंतु कर्मचारीच नसल्याने त्यांना शक्य तेवढी कामे करता आली. निवेदने स्वीकारणे व आवश्यक तेवढी शासन आदेशाच्या तत्काळ अंमलबजावणीची कामे केली जात होती.
जिल्हाधिकाऱ्यांचा संपाशीच सामना
नूतन जिल्हाधिकारी टी.जी. कासार हे रुजू झाले आणि कर्मचाऱ्यांचाही त्याच दिवशी संप सुरू झाला. त्यामुळे त्यांनाही नियमित कामानिमित्ताने अडचणीचा सामना करावा लागला.

Web Title: Revenue Recovery