नित्यनेमाने त्रिकाल पूजा

By Admin | Updated: July 28, 2014 01:01 IST2014-07-27T23:35:50+5:302014-07-28T01:01:22+5:30

हिंगोली : शहरातील जलेश्वर शिवमंदिराचा पूर्वेतिहास प्राचीनतम असल्याने श्रावण महिन्यात भाविकांच्या गर्दीने हे मंदिर फुलणार आहे.

Regularly worshiping trikal | नित्यनेमाने त्रिकाल पूजा

नित्यनेमाने त्रिकाल पूजा

हिंगोली : शहरातील जलेश्वर शिवमंदिराचा पूर्वेतिहास प्राचीनतम असल्याने श्रावण महिन्यात भाविकांच्या गर्दीने हे मंदिर फुलणार आहे. शहरात एकमेव शिवमंदिर असल्याने येणाऱ्या भाविकांची संख्या पाहता संस्थानने धार्मिक कार्यक्रमांपासून पोलिसांच्या सुरक्षेपर्यंतचे नियोजन केले आहे.
दंतकथेच्या पार्श्वभूमीमुळे हिंगोलीवासियांची पूर्वापार श्रद्धा या मंदिराशी जोडली गेल्याने वर्षभर भाविकांची रेलचेल असते. मंदिरातर्फे चातुर्मासाची सुरूवात श्रावणात होते. नंतर भाद्रपद, आश्विन, कार्तिक महिन्यापर्यंत सण, व्रत-वैकल्याचा महिना असल्याने हे कार्यक्रम पार पडतात. श्रावणातील प्रत्येक दिवशी मंदिरातील पांडवकालीन वालुकामय पिंडीची त्रिकाल पूजा केली जाते. मागील अनेक वर्षांपासून आजतागायत ही परंपरा कायम आहे. यंदाही सकाळ, दुपार आणि संध्याकाळी श्रींच्या मूर्तीची पूजा करण्यात येणार आहे. प्रत्येक सोमवारी रात्री भजन, मध्यरात्री फराळाचा महाप्रसाद वाटप केला जाणार आहे. नागपंचमीच्या दिवशी मंदिरापासून पालखी निघणार आहे. ती सराफा बाजार, कपडा गल्ली, मेडिकल लाईनमार्गे कयाधूकाठी पोहोचेल. तिथे महादेव आणि नागाच्या मुकुटाची पूजा करून आल्यामार्गे जलेश्वर मंदिरात परतून ही पालखी मिरवणूक विसर्जित केली जाईल. दरम्यान,
कै. महंत नारायण पुरी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्तही विविध कार्यक्रम होणार असल्याचे मंदिराचे महंत सुभाष महाराज पुरी यांनी सांगितले. चारही श्रावण सोमवारी सुरक्षेच्या दृष्टीने पोलिस बंदोबस्ताची मागणी केलेली आहे. कारण वैकुंठ कार्तिकी चतुर्दशी, महाशिवरात्री, नागपंचमी आणि श्रावण महिन्यात भाविकांची दिवसभर रीघ असते. दिवसेंदिवस भाविकांचा वाढता ओढा पाहता यंदा संस्थानने श्रावणाची जय्यत तयारी केली आहे. भाविकांना सुलभतेने दर्शन घेता यावे, यासाठी प्रयत्न होत आहेत. परिसरात स्वच्छताही करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Regularly worshiping trikal