कारखान्यात रोजगारासाठी रांगा

By Admin | Updated: July 6, 2014 00:36 IST2014-07-06T00:30:39+5:302014-07-06T00:36:01+5:30

साहेबराव हिवराळे , औरंगाबाद खरीप हंगामाच्या निमित्ताने गावाकडे गेलेले हंगामी मजूर दुष्काळाच्या सावटामुळे शहराकडे परतत आहेत.

Range for employment in the factory | कारखान्यात रोजगारासाठी रांगा

कारखान्यात रोजगारासाठी रांगा

साहेबराव हिवराळे , औरंगाबाद
खरीप हंगामाच्या निमित्ताने गावाकडे गेलेले हंगामी मजूर दुष्काळाच्या सावटामुळे शहराकडे परतत आहेत. दहावी, बारावी, पदवीधरांनी औद्योगिक क्षेत्र, मॉल, कॉल सेंटरवर रोजगाराचा शोध सुरू केला आहे; परंतु पाणीटंचाई, वाळू, खडीचे भाव भडकल्यामुळे बांधकामे बंद आहेत. पर्यायाने मजूर बेरोजगार झाला आहे.
गेल्या महिन्यात मजुरांची टंचाई होती. जूनअखेर हंगामी मजूर कुटुंबियांसह शहरात आल्यामुळे कामगार नाक्यावर मजुरांची गर्दी वाढली आहे. मजुरांचा पुरवठा जास्त झाला आणि कामे कमी झाली आहेत. आठ-आठ दिवस काम किंवा रोजगार मिळत नसल्यामुळे त्यांची व कुटुंबियांची उपासमार होत आहे.
औरंगाबादेत मजुरांची टंचाई असल्याच्या पार्श्वभूमीवर परराज्यांतील मजूर पुन्हा परतले आहेत. त्यांना एक महिन्यापासून काम नाही.
तेही आता दुष्काळी जिल्ह्यातून परतीच्या मार्गावर असल्याचे बांधकाम व्यावसायिकांचे म्हणणे आहे. बांधकाम साहित्याचे भाव वाढल्याने आणि महत्त्वाचे म्हणजे बांधकामासाठी पाणी उपलब्ध नसल्यामुळे पैसे का गुंतवावेत, असा विचार अनेकांनी केला आहे. गेल्या महिन्यात मजूर मिळविण्यासाठी बांधकाम व्यावसायिकांत खूप स्पर्धा होती. ग्रामीण भागात वाहने पाठवून मजुरांची ने-आण केली जायची. आता नाक्यावर मजुरांची टंचाई नाही. नुकतीच पदवी मिळविलेले विद्यार्थी आवडीनुसार नोकरीच्या शोधात दिसतात.


खेड्यात, शेतावर राबण्यापेक्षा मॉल किंवा मोबाईल कंपनीच्या कॉल सेंटरवर कामासाठी सुशिक्षित बेरोजगारांची गर्दी दिसत आहे.

गर्दीत कुशल कामगार नाहीत
औरंगाबाद शहरात व औद्योगिक क्षेत्रातील नाक्यावर खेड्यातील मजूर येत असून, हंगामी मजूर मिळत असले तरी कुशल कामगारांची कमतरताच जाणवते.
नवीन औद्योगिक प्रशिक्षणाच्या संधीतून कुशल कामगारांची आजही गरज आहे, असे मासिआचे संपर्क अधिकारी फुलचंद जैन यांनी सांगितले.
साहित्य महागले
बांधकाम साहित्याचे दर वाढल्याने अनेकांनी बांधकामे थांबविली असून, खेड्यातील मजूर शहरात आले असले तरी त्यांच्या हाताला रोजगार नसल्याने उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. पाऊस असल्यास दुष्काळसदृश स्थिती पालटेल अशी अपेक्षा आहे, असे भगवान गायकवाड यांनी सांगितले.
हाताला काम मिळालेच पाहिजे
औद्योगिक क्षेत्रात बेरोजगारांना काम मिळालेच पाहिजे. कारण त्यांच्यावर शिक्षणासह कुटुंबियांचीही जबाबदारी असते. अकुशल कामगारांना कुशलतेकडे नेण्याचे कामही घेतले जावे, अशी मागणी कामगार नेते अनिल जाभाडे, किशोर जाधव यांनी केली.

Web Title: Range for employment in the factory