मुंबईतील मुसळधार पावसाने रेल्वे, विमान प्रवाशांची ‘तुंबई’, ट्रॅव्हल्सचे वाढले ‘कॅन्सलेशन’
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 17:55 IST2025-08-20T17:55:05+5:302025-08-20T17:55:05+5:30
इंडिगोचे रात्रीचे विमान रद्द : मुंबईहून येणारी वंदे भारत एक्स्प्रेस रद्द, इतर रेल्वेंना विलंब

मुंबईतील मुसळधार पावसाने रेल्वे, विमान प्रवाशांची ‘तुंबई’, ट्रॅव्हल्सचे वाढले ‘कॅन्सलेशन’
छत्रपती संभाजीनगर : मुंबईतील मुसळधार पावसाने मंगळवारी विमानसेवा आणि रेल्वेचे वेळापत्रक विस्कळीत झाल्याचा फटका छत्रपती संभाजीनगरातील प्रवाशांना बसला. इंडिगोचे मुंबईचे रात्रीचे विमान रद्द झाले. मुंबईहून येणारी वंदे भारत एक्स्प्रेस रद्द झाली. मुंबईहून दुपारी निघणारी जनशताब्दी एक्स्प्रेस सायंकाळपर्यंत निघालेली नव्हती नंतर तीही रद्द झाली. तपाेवन आणि राज्यराणी एक्स्प्रेस उशिराने धावल्या, तर मुंबईला जाणारी जनशताब्दी एक्स्प्रेस इगतपुरीपर्यंतच धावली. परिणामी, प्रवाशांचा खोळंबा झाला.
छत्रपती संभाजीनगरहून मुंबईसाठी मंगळवारी सकाळी ०९:३० वाजता रवाना झालेली जनशताब्दी एक्स्प्रेस ही इगतपुरीपर्यंतच धावली. याठिकाणीही ही रेल्वे ४ तास उशिराने पोहोचली. इगतपुरी ते मुंबईदरम्यान ही रेल्वे रद्द करण्यात आल्याने पुढेही जाता येईना आणि मागेही येता येईना, अशी प्रवाशांची स्थिती झाली. दुसरीकडे मुंबईहून जनशताब्दी, राज्यराणी एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचाही खोळंबा झाला. मुंबईहून १२:१० वाजता निघणारी जनशताब्दी एक्स्प्रेस रात्री उशिरापर्यंत निघालेली नव्हती, तर राज्यराणी एक्स्प्रेस सायंकाळी ०६:४५ ऐवजी रात्री २२:३० वाजता मुंबईहून सुटण्याचे नियोजन करण्यात आले. मुंबईसाठी धावणारी एसटी नेहमीप्रमाणे धावल्याची माहिती विभागीय वाहतूक अधिकारी संतोष घाणे यांनी दिली.
सकाळचे मुंबई विमान सव्वातास उशिरा
इंडिगोचे मुंबईहून सकाळी येणारे विमान मंगळवारी सव्वातास उशिराने आले, तर रात्री ०८:२५ वाजता शहरात दाखल होणारे आणि पुन्हा ०८:५५ वाजता मुंबईसाठी उड्डाण घेणारे विमान रद्द करण्यात आले. याविषयी प्रवाशांना दुपारीच कल्पना देण्यात आल्याचे विमानतळाच्या सूत्रांनी सांगितले.
एका बसमध्ये फक्त १० ते १२ प्रवासी
शहरातून दररोज २४ ट्रॅव्हल्स धावतात. मुंबईला ये- जा करणाऱ्या ट्रॅव्हल्स धावल्या; परंतु मुंबईतील पावसामुळे प्रवास रद्द करण्याचे प्रमाण वाढले. त्यामुळे केवळ १० ते १२ प्रवाशांना घेऊन बस धावल्या.
-मोहन अमृतकर, सचिव, औरंगाबाद बस ओनर्स वेल्फेअर असोसिएशन