बलात्कारास विरोध, १९ वर्षीय वासनांधाचे विवाहितेवर तब्बल १५ वार; छ. संभाजीनगरमधील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 14:07 IST2025-03-05T13:01:17+5:302025-03-05T14:07:05+5:30
विवाहितेच्या संपूर्ण शरीरावर चाकूने वार; गंभीर जखमी महिलेवर आयसीयूमध्ये उपचार, तब्बल ६२ टाके

बलात्कारास विरोध, १९ वर्षीय वासनांधाचे विवाहितेवर तब्बल १५ वार; छ. संभाजीनगरमधील घटना
छत्रपती संभाजीनगर : बलात्काराचा प्रयत्न केल्यानंतर ३६ वर्षीय विवाहितेने आरडाओरडा सुरू केल्याने विकृताने तिच्या संपूर्ण शरीरावर धारदार चाकूने वार केले. तिचा चेहराही विद्रूप करत हत्येचा प्रयत्न केला. रविवारी सायंकाळी ही धक्कादायक घटना घडली. अभिषेक तात्याराव नवपुते (१९, रा. घारदोन) असे विकृताचे नाव असून, चिकलठाणा पोलिसांनी त्याला मंगळवारी अटक केली.
अनेक दिवसांपासून अभिषेक महिलेचा पाठलाग करीत होता. विवाहितेने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. २ मार्च राेजी विवाहिता सायंकाळी शेतात काम करीत होती. अभिषेकने शेतात जावून तिचा गळा दाबला व तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. विवाहितेने त्याला तीव्र विरोध केला. त्यामुळे अभिषेकने तिचा गळा पकडून तिला जमिनीवर आपटले. तिचा चेहरा, पोट, मान, हात, डोक्यात चाकूने १५ पेक्षा अधिक वार केले. त्यानंतरही त्याने अत्याचाराचा प्रयत्न केला. मात्र, विवाहिता बेशुद्ध पडल्याने तिच्या डोक्यात दगड घालून ती मृत झाल्याचे समजून पसार झाला.
तब्बल ६० टाके
शेताच्या दुसऱ्या टोकाला असलेली सासू घरी निघाल्यानंतर तिला शेताच्या रस्त्यात सून रक्तबंबाळ, बेशुद्धावस्थेत आढळली. त्यानंतर कुटुंबाने तिला शहरात आणले. गजानन महाराज मंदिर परिसरातील एका रुग्णालयाने दाखल करून घेण्यास नकार दिल्याने दुसऱ्या खासगी रुग्णालयात दाखल केले. सोमवारी रात्री शुद्धीवर आल्यावर तिने पोलिसांना सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर अभिषेकवर गुन्हा दाखल करण्यात आला. तिच्या शरीरावर तब्बल ६० टाके पडल्याचे पोलिसांनी सांगितले.
शेतात लपून बसला
विवाहिता मृत झाल्याचे समजून अभिषेक निघून गेला. सोमवारी रात्री गुन्हा दाखल झाल्याचे कळताच तो गाव परिसरातील शेतात लपून बसला होता. अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, उपअधीक्षक पूजा नांगरे यांनी तत्काळ कारवाईच्या सूचना केल्या. निरीक्षक रविकिरण दरवडे, उपनिरीक्षक सतीश पंडित यांनी शोध घेत त्याला शेतातून अटक केली. अभिषेक बारावी नापास आहे. बुधवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.