औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालये, शासकीय तंत्रनिकेतन आणि शासकीय औषधनिर्माण महाविद्यालयांमध्ये कार्यरत वर्ग ३ व वर्ग ४ प्रवर्गातील ५५ कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळाली आहे. त्याबद्दल महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण कर्मचारी संघटनेच्या सदस्यांनी जल्लोष केला. यासंदर्भात शुक्रवारी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण कर्मचारी संघटनेने तंत्रशिक्षण सहसंचालक महेश शिवणकर यांचे आभार व्यक्त केले. वर्ग ४ मधून वर्ग ३ मध्ये १७ जणांना, तसेच अन्य प्रवर्गातील ३८, अशा एकूण ५५ कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळाली.
याप्रसंगी तंत्रशिक्षण कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सुरेश करपे म्हणाले की, सहसंचालक शिवणकर यांनी सकारात्मक दृष्टिकोनातून समोर आलेल्या फायलींचा निपटारा केला. कोणताही भेदभाव न करता पात्र कर्मचाऱ्यांची पदोन्नतीची प्रक्रिया पार पाडली. त्यांना धन्यवाद द्यावे तेवढे कमीच आहेत. यावेळी करपे यांच्या हस्ते शिवणकर यांचा सत्कारही करण्यात आला.
संघटनेचे सचिव नीलेश भोसले म्हणाले, अतिशय कमी काळात सहसंचालकांनी सन २०२०-२०२१ मध्ये ४५० कर्मचाऱ्यांच्या कालबद्ध पदोन्नतीच्या प्रकरणांचा निपटारा केला.
सहसंचालक शिवणकर यांनी कर्मचाऱ्यांनी कामाप्रती निष्ठा ठेवून नवीन तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करावा. तंत्र शिक्षणाचा दर्जा वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले. यावेळी शेषराव भवर, विजय शृंगारे, शेखर कांबळे, सतीश कागडा, किशोर मोहिते, इकलेश गायकवाड, सुदाम दिवटे, हिरेंद्र बावसीवाल, सुरेश बावत, विजय पानसरे, अभिजित खंडाळे, संघटनेचे पदाधिकारी, तसेच पदोन्नती झालेले सर्व कर्मचारी उपस्थित होते.
फोटो कॅप्शन :
महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण कर्मचारी संघटनेच्या वतीने तंत्रशिक्षण सहसंचालक डॉ. महेश शिवणकर यांचा सत्कार करताना संघटनेचे अध्यक्ष सुरेश करपे, सचिव नीलेश भोसले व पदोन्नत कर्मचारी.