राष्ट्रपती शौर्यचक्र प्राप्त आयपीएस सोमय मुंडे छत्रपती संभाजीनगराच्या पोलिस उपायुक्तपदी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2025 12:43 IST2025-05-23T12:43:10+5:302025-05-23T12:43:40+5:30
उपायुक्त नितीन बगाटे यांना पदोन्नती, रत्नागिरीच्या पोलिस अधीक्षकपदी नियुक्त

राष्ट्रपती शौर्यचक्र प्राप्त आयपीएस सोमय मुंडे छत्रपती संभाजीनगराच्या पोलिस उपायुक्तपदी
छत्रपती संभाजीनगर : गुन्हा घडूच नये, यासाठी झटणारे अधिकारी म्हणून ओळख असलेले तथा राष्ट्रपती शौर्यचक्रप्राप्त आयपीएस अधिकारी सोमय विनायक मुंडे यांची शहराच्या पोलिस उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली, तर उपायुक्त नितीन बगाटे यांची रत्नागिरी जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली.
राज्याच्या गृहविभागातर्फे गुरुवारी २२ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. यात छत्रपती संभाजीनगर परिमंडळ एकच्या पोलिस उपायुक्तपदी मुंडे यांची नियुक्ती झाली. २०१६ च्या बॅचचे आयपीएस मुंडे यांच्या सेवेची सुरुवात वैजापूर पोलिस ठाणे प्रभारी म्हणून झाली होती. त्यानंतर अमरावती येथे उपअधीक्षक म्हणूनही काम पाहिले. गडचिरोलीचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक असताना नोव्हेंबर, २०२१ रोजी छत्तीसगडच्या सीमेलगतच्या घनदाट जंगलात जवळपास शंभरावर नक्षलवाद्यांसोबतच्या चकमकीत मुंडे यांनी सहकाऱ्यांसोबत साहसी लढा दिला. यात कोट्यवधीचे बक्षीस असलेल्या मिलिंद तेलतुंबडेचा खात्मा झाला होता. त्यांच्या या साहसी कृत्यासाठी त्यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ९ मे रोजी शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आले.
आयआयटी ते आयपीएस
देगलूरमध्ये शालेय शिक्षण झालेल्या मुंडे यांनी साताऱ्याच्या सैनिकी स्कूलमधून सातवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर देहरादून येथील इंडियन मिलिटरी कॉलेजमध्ये दहावीपर्यंतचे शिक्षण घेऊन हैदराबादमध्ये उच्च माध्यमिकची पदवी घेत पुढे पवई आयआयटीमधून केमिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले.
२०२४ मध्ये 'लोकमत' तर्फे गौरव
-२०२४ मध्ये लोकमत समूहातर्फे मुंढे यांचा उल्लेखनीय कार्यासाठी आयपीएस प्रॉमिसिंग या श्रेणीमध्ये महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
-२०२३ मध्ये भारतीय तंत्रज्ञान संस्था कानपूरच्या वतीने सत्येंद्रकुमार दुबे स्मृती पुरस्कार प्राप्त झाला.
-२०२५ मध्ये लातूरमध्ये बालकांसंदर्भात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगातर्फे राज्यस्तरीय बालस्नेही पुरस्कार प्रदान करण्यात आला.
डॅशिंग बगाटे रत्नागिरीच्या अधीक्षकपदी
डॅशिंग अधिकारी तथा शहराचे सुपुत्र आयपीएस अधिकारी नितीन बगाटे यांची रत्नागिरीच्या अधीक्षकपदी नियुक्ती झाली. सप्टेंबर, २०२३ मध्ये बगाटे शहराच्या उपायुक्तपदी रुजू झाले होते. अवैध धंदे, सायलेन्सरविरोधातल्या मोहिमा चर्चेत राहिल्या. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली. फेब्रुवारी, २०२४ मध्ये रामगिरी येथील १७, ५०० टन गॅस घेऊन जाणाऱ्या कंटेनरच्या अपघातानंतर बगाटे यांनी तातडीने पाऊल उचलत हजारो नागरिकांचा जीव वाचवला होता.