४१ अंशाचा पारा अन् रात्री वीज गायब; महावितरणच्या ओव्हरलोडचा छ. संभाजीनगरकरांना फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 18:21 IST2026-04-17T18:20:06+5:302026-04-17T18:21:26+5:30

दिवसा उन्हाचा तडाखा, रात्री महावितरणचा झटका; छत्रपती संभाजीनगरकर घामाघूम

Power Crisis in Chhatrapati Sambhajinagar: 20,000 Citizens Suffer as Overloaded Grids Cause Blackouts in 41°C Heat | ४१ अंशाचा पारा अन् रात्री वीज गायब; महावितरणच्या ओव्हरलोडचा छ. संभाजीनगरकरांना फटका

४१ अंशाचा पारा अन् रात्री वीज गायब; महावितरणच्या ओव्हरलोडचा छ. संभाजीनगरकरांना फटका

छत्रपती संभाजीनगर : तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे वाढलेल्या विजेच्या मागणीचा भार महावितरणच्या वाहिन्यांना सोसवेना झाला आहे. त्यामुळे शहरात एकीकडे दिवसभर प्रखर उन्हाने नागरिक हैराण होत असताना, गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी होणाऱ्या विजेच्या लपंडावामुळे उकाड्याचा त्रास दुप्पट झाला आहे. शहरातील विविध भागांतील वीजपुरवठा गुरुवारी रात्री खंडित झाला. पन्नालालनगर उपकेंद्राकडे येणारे दोन्ही ३३ केव्ही फीडर ओव्हरलोड होऊन बंद पडले. त्यामुळे जवळपास २० हजार नागरिकांचा वीजपुरवठा दीड ते दोन तास बंद राहिला. परिणामी, उकाड्याने आबालवृद्धांचे हाल झाले.

शहरात गुरुवारी कमाल तापमान ४१.४ अंश सेल्सिअस होते. उकाड्यापासून सुटका करून घेण्यासाठी फॅन, कुलर, एसी ही विद्युत उपकरणे नागरिक वापरत आहेत. महावितरणच्या ३३ केव्ही पन्नालालनगर उपकेंद्रास महापारेषणच्या चिकलठाणा व सातारा येथील १३२ केव्ही उपकेंद्राद्वारे वीजपुरवठा केला जातो. मात्र विजेच्या वाढत्या मागणीचा भार न पेलल्यामुळे सातारा फीडर सायंकाळी ७:१५ च्या सुमारास बंद पडला. त्यामुळे या फीडरवरील भार चिकलठाणा फीडरवर वळवून वीजपुरवठा सुरू केला. मात्र हा फीडर ओव्हरलोड होऊन रात्री ८:५२ वाजता बंद पडला. दोन्ही फीडर बंद पडल्यामुळे पन्नालालनगर उपकेंद्र काळोखात गेले. मोंढा नाका, सिंधी कॉलनी, बालाजीनगर, पन्नालालनगर, रमानगर, काल्डा कॉर्नर, अजबनगर, बौद्धनगर, आदी भागांतील वीजपुरवठा खंडित झाला.

दरम्यान, महावितरणच्या अभियंते, कर्मचाऱ्यांनी बिघाड शोधण्यासाठी दोन्ही फीडरवर पेट्रोलिंग सुरू केले. रात्रीच्या अंधारात बॅटरीच्या उजेडात तंत्रज्ञांनी प्रत्येक खांब तपासला. तबरीच पायपीट केल्यावर चिकलठाणा फीडरवार हनुमाननगरमध्ये, तर सातारा फीडरवर एमआयटी कॉलेजजवळ खांबावरील जंप तुटल्याचे निदर्शनास आले. अथक परिश्रमानंतर चिकलठाणा फीडर रात्री १०:०५ वाजता सुरू झाला. १० मिनिटांच्या अंतराने सातारा फीडरही सुरू झाला. कार्यकारी अभियंता महेंद्र देशमुख व त्यांच्या ३० सहकाऱ्यांनी वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी परिश्रम घेतले.

नागरिक त्रस्त
शहरातील नागरिक विजेच्या लंपडावाने नागरिक त्रस्त झाले आहेत. इन्व्हर्टर, बॅटरी विक्रेते, उत्पादकांसाठी हा प्रकार सुरू आहे का? दिवसातून पाच-पाच वेळा वीज जाते. त्यामुळे आता वीज बिल भरूच नये का, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
- विलासचंद्र काबरा, अध्यक्ष, ऊर्जा सहयोग

Web Title : भीषण गर्मी और ओवरलोड के कारण छत्रपति संभाजीनगर में बिजली गुल

Web Summary : भीषण गर्मी और बिजली लाइनों पर अत्यधिक भार के कारण छत्रपति संभाजीनगर में बिजली गुल हो गई। तपती रातों में बिजली कटौती से हजारों लोगों को परेशानी हुई। मरम्मत के बाद बिजली आपूर्ति बहाल हुई।

Web Title : Heatwave and Power Outages Plague Chhatrapati Sambhajinagar Due to Overload

Web Summary : Extreme heatwave and overloaded power lines caused prolonged outages in Chhatrapati Sambhajinagar. Thousands faced discomfort as power cuts disrupted fan and AC use during scorching nights. Repairs restored supply after frantic efforts.