शासकीय कार्यक्रमाला राजकीय स्वरूप

By Admin | Updated: February 4, 2015 00:42 IST2015-02-04T00:25:47+5:302015-02-04T00:42:15+5:30

माजलगाव : येथील पोलीस उपविभागीय अधिकारी व ग्रामीण पोलीस स्टेशनच्या इमारत कामाच्या भूमिपूजन समारोहाच्या पत्रिकेत विनित म्हणून चक्क जिल्हाधिकारी

The political nature of the government program | शासकीय कार्यक्रमाला राजकीय स्वरूप

शासकीय कार्यक्रमाला राजकीय स्वरूप



माजलगाव : येथील पोलीस उपविभागीय अधिकारी व ग्रामीण पोलीस स्टेशनच्या इमारत कामाच्या भूमिपूजन समारोहाच्या पत्रिकेत विनित म्हणून चक्क जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांचीच नावे टाकण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे प्रमुख पाहुण्यांमध्ये भाजपा जिल्हा प्रमुख रमेश पोकळे यांचे नाव टाकण्यात आले आहे. शासकीय कार्यक्रमाला राजकीय स्वरूप मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे.
माजलगाव येथील केसापुरी कॅम्प येथे उपविभागीय पोलीस अधिकारी व ग्रामीण पोलीस स्टेशन माजलगाव या इमारतीचा भूमिपूजन समारंभ बुधवारी सकाळी सव्वादहा वाजता आयोजित करण्यात आला आहे.
या पत्रिकेत उद्घाटक म्हणून गृहराज्यमंत्री राम शिंदे तर अध्यक्ष म्हणून खा. प्रीतम मुंडे यांचे नाव टाकण्यात आले आहे. दरम्यान सदरील काम हे ५५ लाख रुपयांचे तर ग्रामीण पोलीस ठाण्यासाठी १२ लाख रुपये खर्च होणार आहे. या कामाच्या उद्घाटनासाठी जिल्हाधिकारी नवलकिशोर राम व पोलीस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांचे नाव प्रमुख पाहुण्यात पाहिजे असताना त्यांची नावे विनित मध्ये टाकण्यात आली आहेत.
पोलीस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी म्हणाले की, भूमिपूजनाच्या पत्रिकेत चुक आढळून आल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. दुपारनंतर भूमिपूजन समारंभाच्या पत्रिकेत बदल करण्यात आला आहे. (वार्ताहर)
माजलगाव येथे गृहराज्यमंत्री यांच्या हस्ते दोन शासकीय इमारतींचे भूमिपूजन होणार आहे. बांधकाम विभागाच्या वतीने छापण्यात आलेल्या पत्रिकेत जिल्हाधिकारी यांचे नाव विनितमध्ये टाकण्यात आले आहे. या संदर्भात त्यांच्याकडे विचारणा केली असता ते म्हणाले, सदरील कार्यक्रमाची माहिती मला नाही. जिल्हाधिकारी असल्याने माझे नाव कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यामध्ये असायला हवे होते. त्यामुळे माझे नाव विनितमध्ये टाकण्याचा काही संबंध येत नाही, असे झाले असेल तर हा प्रकार चुकीचा आहे.

Web Title: The political nature of the government program