गोळीबारानंतर फरार गुन्हेगार तेजाच्या आईच्याही पोलिसांनी मुसक्या आवळल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 15:26 IST2025-08-20T15:25:17+5:302025-08-20T15:26:02+5:30
एनडीपीएस पथकाने अमली पदार्थांच्या विक्रीत केली होती अटक

गोळीबारानंतर फरार गुन्हेगार तेजाच्या आईच्याही पोलिसांनी मुसक्या आवळल्या
छत्रपती संभाजीनगर : मैत्रिणीवर गोळीबार करून पोलिसांसमक्ष ‘जामिनावर सुटल्यास आणखी चार मुलींना मारेन, त्यात काय एवढे’, अशी धमकी देणाऱ्या गुन्हेगार सय्यद फैजल सय्यद एजाज उर्फ तेजा (रा. किलेअर्क) याची आई रेश्मा अंजुम सय्यद हिला गुन्हे शाखेने अटक केली. गोळीबाराच्या घटनेनंतर तिने घरासमोर पोलिसांना पाहून पळ काढला होता.
११ ऑगस्ट रोजी तेजाने २५ वर्षीय मैत्रिणीवर राहत्या घरात गोळी झाडली होती. मैत्रिणीला रुग्णालयात दाखल करून घरी परतेपर्यंत पोलिस आल्याचे कळताच तेजाची आई रेश्मासह त्याच्या मित्रांनी पोबारा केला होता. अटकेनंतर तेजाने माध्यमांच्या कॅमेऱ्यांसमोर आणखी चार मुलींना मारण्याची धमकी दिली. त्यानंतर गुन्हे शाखेने त्याचे मुंडण करून शहरातून धिंड काढली होती. रेश्मा अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्नात होती. त्यासंदर्भाने ती भेटीगाठी घेण्यासाठी चुन्नीलाल पेट्रोल पंपाजवळ येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक प्रवीण वाघ यांना मिळाली. त्यावरुन वाघ, अंमलदार सुनील जाधव, नवनाथ खांडेकर, सोमकांत भालेराव, विजय निकम, कृष्णा गायके व शिल्पा तेलोरे यांनी सापळा रचून तिला अटक केली.
महिन्याभरापूर्वीच जामिनावर
तेजासोबतच रेश्मा अमली पदार्थांच्या तस्करीत सक्रिय आहे. मे महिन्यात एनडीपीएसच्या निरीक्षक गीता बागवडे यांनी तिला अमली पदार्थ विकताना रंगेहाथ अटक केली हाेती. त्यात जुलैअखेर ती जामिनावर सुटली होती.