छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यानगर रस्त्यांवरील खड्ड्यांच्या विरोधात खंडपीठात याचिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 19:38 IST2025-11-13T19:36:11+5:302025-11-13T19:38:14+5:30
रस्त्याच्या दुरुस्तीसाठी काय प्रयत्न केले; किती अपघात झाले याचा अहवाल खंडपीठाने मागविला

छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यानगर रस्त्यांवरील खड्ड्यांच्या विरोधात खंडपीठात याचिका
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यानगर रस्त्यांवरील खड्ड्यांच्या विरोधात दाखल याचिकेच्या अनुषंगाने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या न्या. विभा कंकणवाडी व न्या. हितेन वेनेगावकर यांनी राज्य शासनासह छत्रपती संभाजीनगर व अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांना याचिकेत प्रतिवादी करण्याचे निर्देश दिले. रस्त्याच्या दुरुस्तीसाठी काय प्रयत्न केले यासंबंधीची विचारणा करण्यात आली. या काळात किती अपघात झाले यासंबंधीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश राज्यशासनाला नोटीस बजावताना दिले. नेवासा ते अहिल्यानगर प्रवासासाठी ३ ते ४ तास वेळ लागत असल्याने वाहनधारकांसह बसने प्रवास करणाऱ्यांची मोठी अडचण होत असल्याचे याचिकेत म्हटले आहे.
वाहनांची मोठ्या प्रमाणात ये-जा
ॲड. आनंद बांगर यांनी पार्टी इन पर्सन दाखल केलेल्या याचिकेत म्हटल्यानुसार छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यानंगर रस्ता रहदारीसाठी महत्त्वाचा आहे. विदर्भ, खान्देश आणि मराठवाड्यातील वाहनधारकांसह प्रवाशी बस या मार्गाने मोठ्या संख्येने ये-जा करतात. अहिल्यानगरहून पुढे पुणे येथे जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. पुणे येथे आयटी क्षेत्रात नोकरी आणि शिक्षणासाठी मराठवाडा, विदर्भ आणि खान्देशमधील तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याने वाहतूक मोठ्या प्रमाणावर आहे.
अनेक ठिकाणी गुडघ्याएवढे खड्डे
छत्रपती संभाजीनगर बस स्थानकाहून पुण्यासाठी दर १० मिनिटांनी बस आहेत. लालपरी, एशियाड, शिवनेरी, शिवशाही, शिवाई, इलेक्ट्रिक बस मोठ्या संख्येने आहेत. शिवाय मराठवाड्याच्या इतर जिल्ह्यांसह खान्देश व विदर्भातून येणाऱ्या बसची संख्या अधिक आहे. दररोज दीडशेवर खासगी बस पुण्यासाठी याच रस्त्यावरून जातात. अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर हा रस्ता खराब झाला आहे. अनेक ठिकाणी गुडघ्याएवढे खड्डे पडले आहेत. नेवासा फाटा ते नगरपर्यंतचे अंतर ४५ मिनिटांचे असून, प्रत्यक्षात प्रवासासाठी ३ तास लागतात. शासनाच्या वतीने मुख्य सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे यांनी बाजू मांडली.