पंडित विरूद्ध पवार सामना रंगणार

By Admin | Updated: June 10, 2014 00:34 IST2014-06-10T00:30:42+5:302014-06-10T00:34:00+5:30

सखाराम शिंदे, गेवराई मागील अनेक वर्षांपासून गेवराई मतदारसंघावर पंडितांचेच अधिराज्य राहिलेले आहे़ पंडितांच्या भावकीचा वाद चव्हाट्यावर आला; परंतु आमदारकीचा मान पंडितांनाच हे ठरलेले

Pandit will fight against Pawar | पंडित विरूद्ध पवार सामना रंगणार

पंडित विरूद्ध पवार सामना रंगणार

सखाराम शिंदे, गेवराई
मागील अनेक वर्षांपासून गेवराई मतदारसंघावर पंडितांचेच अधिराज्य राहिलेले आहे़ पंडितांच्या भावकीचा वाद चव्हाट्यावर आला; परंतु आमदारकीचा मान पंडितांनाच हे ठरलेले गणित़ यावेळी समीकरणे बदलली आहेत़ दोन्ही पंडितांची ताकद एकवटल्याने भाजपाची कसोटी लागणार आहे़ पंडितांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी पवार यांच्याशी होणारी ‘स्ट्रेट फाईट’ रोमांचक होणारआहे.
गेवराई विधानसभा मतदारसंघात २००९ मध्ये बदामराव पंडित व अमरसिंह पंडित या काका- पुतण्यात लढाई झाली़ राष्ट्रवादीच्या बदामरावांनी भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवत अमरसिंहांचा निसटता पराभव केला़ त्यानंतर अमरसिंहांनी भाजपाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथराव मुंडे यांची साथ सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला़ ‘बक्षिसी’ म्हणून त्यांना विधान परिषदेवर संधी मिळाली़ नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत बदामराव व अमरसिंह यांना शरद पवार यांनी एका मंचावर आणले़ विळ्या-भोपळ्याचे नाते असलेले हे दोन भिडू एकत्रित आल्याने पक्षाची ताकद वाढेल असे सर्वांनाच वाटले; परंतु त्याची ‘रिअ‍ॅक्शन’ झाली अन् मुंडे यांना तब्बल ३१ हजारांचे ंमताधिक्य मिळाले़
अमरसिंह पंडित मुंडेंपासून दुरावल्यानंतर माधवराव पवार हे मुंडेंच्या बाजूने उभे राहिले़ भाजपाचा ढासळलेला बुरूज सावरण्याचे काम माधवराव पवारांचे चिरंजीव अ‍ॅड़ लक्ष्मण पवार यांनी केले़ दोन्ही पंडितांसोबत टक्कर देत त्यांनी मुंंडेंचे मताधिक्य वाढविण्यासाठी महत्त्वाची भूमिका निभावली़ त्यामुळे त्यांचा सराव झाला आहे़ आता विधानसभा निवडणुकीपर्यंत त्यांना भाजपाच्या मागची ताकद कायम ठेवावी लागेल़ राष्ट्रवादीकडून पुन्हा एकदा बदामराव पंडित यांनाच संधी मिळेल, हे जवळपास निश्चित आहे़ खुद्द शरद पवार यांनीच बदामराव यांच्या नावावर गेवराईच्या सभेत शिक्कामोर्तब केले आहे, तर भाजपाकडे अ‍ॅड़ लक्ष्मण पवार यांच्याशिवाय दुसरा स्ट्राँग उमेदवार दिसत नाही़ भाजपाचे नेते व केंद्रीय मंत्री गोपीनाथराव मुंडे यांच्या निधनानंतर आता अ‍ॅड़ लक्ष्मण पवार एकाकी पडले आहेत़ पवारांना ‘वन मॅन आर्मी’ची भूमिका निभवावी लागेल़ शिवसेना, रिपाइं, रासप या छोट्या मित्रपक्षांच्या हातात हात घालून त्यांना दोन्ही पंडितांशी झुंजायचे आहे़
सोयऱ्यांची लढत!
अमरसिंह पंडित व बदामराव पंडित हे कट्टर विरोधक एकत्रित आहेत़ ८ जि़प़ सदस्य, पंचायत समिती, कृषी उत्पन्न बाजार समिती, दूध संघ ही राष्ट्रवादीची ताकद़ मात्र, पंडितांच्या एकीची लोकसभेतील ‘रिअ‍ॅक्शन’ विधानसभेतही राहिली तर राष्ट्रवादीपुढील अडचणी वाढतील़ पवार व पंडित हे सोयरे आहेत़ यापूर्वी माधवराव पवार यांनी शिवाजीराव पंडित यांना आस्मान दाखविले होते़ तब्बल दोन तपानंतर आता पुन्हा एकदा पवार, पंडित असा थेट सामना रंगेल़ सोयऱ्यांची ही लढाई लक्षवेधी ठरेल़

Web Title: Pandit will fight against Pawar