Aurangabad Violence : आमची घरे जळताहेत, लवकर या...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 10:39 IST2018-05-14T01:33:15+5:302018-05-14T10:39:44+5:30
दुकाने, घरे, वाहनांना लागलेली आग विझविण्यासाठी फायरब्रिगेडकडे मदतीसाठी केलेल्या फोनवर अनेक महिला अक्षरश: रडल्या. शुक्रवारी मध्यरात्रीनंतर रात्री १ वाजून १० मिनिटांनी फायरब्रिगेडला पहिला मदतीसाठी फोन आला. त्यानंतर आग लागली आहे, लवकर... अशी आर्त हाक देणारे फोन येत राहिले

Aurangabad Violence : आमची घरे जळताहेत, लवकर या...
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : दुकाने, घरे, वाहनांना लागलेली आग विझविण्यासाठी फायरब्रिगेडकडे मदतीसाठी केलेल्या फोनवर अनेक महिला अक्षरश: रडल्या. शुक्रवारी मध्यरात्रीनंतर रात्री १ वाजून १० मिनिटांनी फायरब्रिगेडला पहिला मदतीसाठी फोन आला. त्यानंतर आग लागली आहे, लवकर... अशी आर्त हाक देणारे फोन येत राहिले, तसे फायरब्रिगेडचे बंब घटनास्थळी गेले. दोन्हीकडील जमाव, बंबमध्ये संपलेले पाणी, एन-५ ते घटनास्थळी टँकर पोहोचेपर्यंतचा वेळ आणि पोलिसांनी घटनास्थळाची परिस्थिती पाहून केलेली अडवणूक यामुळे सर्व काही उपलब्ध असताना काहीही करता आले नाही. फायरब्रिगेडमधील काही जवानांना हा सगळा अनुभव सांगताना भावना अनावर झाल्या होत्या.
अग्निशमन विभागाने सांगितले, राजाबाजार, मोतीकारंजा, शहागंज, नवाबपुरा, गांधीनगर परिसरात शुक्रवारी रात्री ते शनिवारी पहाटेपर्यंत आग विझविण्यासाठी फायर ब्रिगेडला मदतीची अनेकांनी हाक दिली. त्यांनीही प्रत्येक ठिकाणी वेळेत पोहोचण्याचा प्रयत्न केला. समोरच्या बाजूने आग लागली असेल ती आटोक्यात येईपर्यंत दुसऱ्या ठिकाणी आग लावल्याचा फोन येत होता. ती विझविण्यासाठी जाताच तिस-या ठिकाणी आग लावल्याचे फोन येत. त्यामुळे व्हिडिओकॉन, बजाज, गरवारे, एमआयडीसीतील फायरबंबांना पाचारण करण्यात आले.
वाळूज एमआयडीसीचा बंब दंगलखोरांनी फोडला. त्यात कर्मचा-यांनाही मार लागला. अग्निशमन दलाचे ५ जवान दंगलीत जखमी झाले आहेत. काही जणांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. वाहनावर देशी दारूच्या भरलेल्या बाटल्या भिरकावून आग लावण्याचा प्रयत्न झाला. चेलीपुरा, नवाबपु-यातील रंगाची दुकानातील आग विझविण्यासाठी फायरब्रिगेडला जाऊच दिले नाही. गुलमंडीच्या अलीकडेच अग्निशमन विभागाची वाहने रोखण्यात आली. शहागंजमधील चप्पल मार्केटपर्यंत फायरबंबाला जाऊ दिले नाही.